उपमुख्यमंत्री अजित पवारांची तुफान फटकेबाजी; द्राक्ष परिषदेत हशा पिकला, म्हणाले..
By विश्वास मोरे | Published: August 28, 2023 08:49 PM2023-08-28T20:49:46+5:302023-08-28T20:50:47+5:30
बंगळुरू पुणे-मुंबई महामार्गवरील वाकड येथे झालेल्या महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवार उपस्थित होते.
पिंपरी : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने वाकड येथील द्राक्ष परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार वाईन कोणाला चढते आणि चढत नाही हे सांगून टाकले. द्राक्ष परिषदेत विनोदी किश्श्ये सांगून हशा पिकविला. ‘‘कोणाला एक वाइन पिली की किक बसते कोणाला खंबा मारला तरी किक बसत नाही, कोणाला पहिल्या धारेची पचते, तर कोणाला अख्खा खंबा ही पचतो, अन् कोणाकोणाला तर एखाद्या घोट पण भारी पडतो. पण, सुदैवाने मी अजून दारूला स्पर्श ही केला नाही, असे गुपित उपमुख्यमंत्र्यांनी उघड केले.
बंगळुरू पुणे-मुंबई महामार्गवरील वाकड येथे झालेल्या महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवार उपस्थित होते. आजच्या भाषणात पवार यांनी अनेक किश्ये सांगितले. मिश्किलपणे टीपन्नी केली. पवार म्हणाले, ‘‘देशी दारूच्या दुकानांना वाईन्स म्हटलं जातं. त्यामुळे काही घटकांचा असा विचार झाला की हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकताहेत. मुळात ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्ष पासून निर्मित होणारी वाईन्स यात फरक आहे. हे तुम्ही जाणून आहात. काही देशांत तर पाण्याऐवजी वाईन्स पितात.’’
मी अजून स्पर्श ही केलं नाही, हे सुदैव!
पवार म्हणाले, ‘‘कोणाला पहिल्या धारेची पचते, तर कोणाला अख्खा खंबा ही पचतो, अन कोणाकोणाला तर एखाद्या घोट पण भारी पडतो. पण, सुदैवाने मी अजून दारूला स्पर्श ही केला नाही.’’
तुम्ही म्हणाल, काय पवार- पवार चाललय!
अजित पवार यांनी विवीध कोट्या केल्या. पवार म्हणाले, ‘‘आदरणिय शरद पवार हे नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतातच. म्हणूनच काल या परिषदेच्या शुभारंभाला पवार साहेब होते. आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं पवारच आहेत. आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार आहे.’’
ह्याच्या काकाने असं पाणी दाखवलं
पवार म्हणाले, ‘‘ऑगस्टच्या अखेरीस पाऊस पडेल, असं म्हणत होते, कशाचे काय पाऊस आलाच नाही, आता म्हणताहेत सप्टेंबरच्या सुरुवातीला पडेल. आता तर काही महाभाग असे जन्माला आलेत ते सांगतात पाऊस कधी येणार ते. पूर्वी जसं विहीर आणि बोअरचा पानवट्या यायच्या, हातात नारळ घेऊन पुढं चालत चालत पाणी दाखवायचा. ह्याच्या काकाने असं पाणी दाखवलं होतं.’’ यावर हशा पिकला.