पिंपरी : बदली करण्याचा निर्णय हा राज्यशासनाचा आहे. हा निर्णय कोणताही अधिकारी स्वत: घेत नाही. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याला मुदतपूर्व बदली नको असते. त्यामुळे माझी बदली होणार की नाही हे माहित नाही. मात्र मी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी बदलीच्या चर्चेवर आपली भावना व्यक्त केली.
राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून नवीन सत्ता समीकरण तयार झाले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये लक्ष घातले असून बैठका घेत सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्याबाबत विचारले असता आयुक्त शेखर सिंह यांनी बदलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी आल्यापासून तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर व राजेश पाटील यांचे प्रकल्प पुढे नेण्याचे प्रयत्न करत आहे. एखादे काम हाती घेतल्यानंतर त्याला वेळ लागतो. नवीन कोणी अधिकारी आला तरी त्याला आढावा घेत महापालिका समजून घेण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी जातो. त्यामुळे कोणत्याच अधिकाऱ्याला मुदतपूर्व बदली नको असते. मात्र बदली करायची की नाही हा प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारित येतो. शासनाला वाटले तर बदली होते. त्यामुळे माझी बदली होईल की नाही हे मला देखील माहीत नाही. पण कार्यकाळ पू्र्ण करण्याची इच्छा असल्याचे सांगत बदली प्रकरणाच्या चर्चेवर मत व्यक्त केले.