‘नॉट रिचेबल’ अजित पवारांची बारामतीकरांना प्रतीक्षा; दिवाळीत भेटणारे दादा, यंदा गेले कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:48 AM2019-10-28T00:48:36+5:302019-10-28T06:15:29+5:30
निवडणुकांच्या आधीही अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर असेच ‘नॉट रिचेबल’ झाले होते
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीत १ लाख ६५ हजार २६५ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळविले. बारामतीत प्रथमच सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा इतिहास यंदा घडला आहे. मात्र दिवाळीत आवर्जुन बारामतीकरांना भेटणारे अजितदादा ‘नॉट रिचेबल’ आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ च्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केल्याने बारामती हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. मात्र, या घडामोडींपासून अजित पवार प्रथमच अलिप्त दिसत आहेत.
सोमवारी दिवाळी पाडवा आहे. पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्यासह अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, नेते येतात. सुमारे ७ ते ८ तास हा शुभेच्छा सोहळा पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी रंगतो. दरवर्षी पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने दिवाळीत बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने शारदोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही शारदोत्सवाला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. मात्र, ते स्वत: उपस्थित नव्हते.
निवडणुकांच्या आधीही अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर असेच ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यानंतर शरद पवारांवर आरोप झाल्याने व्यथित होऊन राजीनामा दिल्याचे कारण त्यांनी सांगितले होते.
थोरातांच्या भेटीवेळी अनुपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय जगताप यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील बारामतीला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार उपस्थित होते. पण अजित पवार यांची अनुपस्थिती बारामतीकरांना खटकल्याचे दिसून येते.