बारामती (पुणे): बारामती नगरपरीषदेच्या इमारतीवर ‘बारामती नगरपरीषद’ या अक्षरांचा रंग उडाल्याचे पाहून संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पदाधिकाऱ्यांना तातडीने ही अक्षरे बदलण्याची सूचना केली. दोन तासात रंग उडालेली अक्षरे बदला, अजित पवार दोन तासाने पुन्हा येऊन झालेला बदल पाहणार असल्याचे सांगायला पवार विसरले नाहीत. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. अवघ्या दोन तासात ‘बारामती नगरपरीषदे’ची नवीन अक्षरे लावण्यात आली.
जुनी रंग उडालेली अक्षरे बदलून नवीन रंगीत ‘नाव’ लावेपर्यंत नगरपरीषद अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी थांबून होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि २५) सकाळी बारामती नगरपरीषदेच्या सोलर प्रकल्पाचे भल्या सकाळी उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. तसेच यावेळी शहरात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सबाबत कडक धोरणाचा अवंलब करण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी पवार यांनी नगरपरीषद पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत कडक सूचना दिल्या. शहराच्या सुशोभिकरणात बाधा आणणाऱ्या बाबी निदर्शनास आल्याने उपमुख्यमंत्र्यांचा पारा चढला. त्यामुळे उपस्थितांची तारांबळ उडाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही फ्लेक्स पाहिल्याने याबाबत कडक धोरण अवलंबण्याची सुचना केली. याबाबत कोणालाही दयामाया दाखवू नका, अगदी अजित पवार असेल तरी गुन्हा दाखल करा. नगरसेवकाने लावल्यास नगरसेवक पद घालवा. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यावर गुन्हे दाखल करा, अजित पवार तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला सुचना दिल्या. शहराच्या सुशोभिकरणात अडथळा आणणाऱ्या गोष्टी दूर करा. शहरातील वायरींग भुमिगत करण्यात आले आहे. त्यानंतर देखील काही ठीकाणी वायर लोंबकळताना दिसतात. पोलीस अधिकाऱ्यांनी यात आवश्यक ठिकाणी लक्ष घालण्याचे आदेश पवार यांनी दिले.