बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता खेचून आणली आहे. कारखान्याच्या निकाल जाहीर झालेल्या 18 जागांपैकी राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलने १3 जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी सहकार पॅनलचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे आणि विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांच्यासह पाच जणांचा विजय झाला. मात्र कारखान्याची सत्ता टिकवण्यात त्यांना यश आले नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाल्यावर २०१५ मध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव केला होता. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची रसद त्यांना मिळाली होती. त्यामुळे या वेळी पवार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. या पराभवाचा वचपा पवार यांनी काढला. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तालुक्यातील महत्वाच्या सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळविण्यात अजित पवार यशस्वी झाले आहे.
कारखान्याच्या मात्र, पहिल्या गटातील मतमोजणीपासूनच प्रचंड चुरस पाहायला मिळाली. माळेगाव गटात राष्टÑवादीचा उमेदवार अवघ्या १४१ मतांनी विजयी झाला. या गटातून निळकंठेश्वर पॅनलचे बाळासाहेब तावरे आणि संजय काटे विजयी झाले. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे ६,४११ मते मिळवून विजयी झाले. बाळासाहेब तावरे यांना ६,१८४, संजय काटे ५,७४४ मते मिळवून विजयी झाले. सत्ताधारी पॅनलला माळेगांव गटात १७ हजार ३८७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला १७ हजार ५३१ मते मिळाली. पणदरे गटात निळकंठेश्वर पॅनलचे योगेश जगताप, केशवराव जगताप आणि तानाजी कोकरे विजयी झाले. ब वर्ग प्रतिनिधी संघातून निळकंठेश्वर पॅनेलचे स्वप्नील शिवाजीराव जगताप यांनी ७७ मते मिळवुन विजय मिळवत राष्ट्रवादीला खाते उघडून दिले. सत्ताधारी गटाचे चतुर्भुज जगन्नाथ मुळीक यांना २० मते मिळाली. मतमोजणी केंद्रातील काही जणांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला गेल्याने मतमोजणी उशिरा सुरू झाली. त्यामुळे अंतिम निवडणूक निकाल हाती येण्यास दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली.