पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झटपट निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीची जाणीव सगळ्यांनाच आहे.पण ज्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी ते आले तेच कार्यालय फार काळ तिथे राहू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर इतके जास्त भाडे असलेले कार्यालय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात वारंवार केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्राच्या कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर उषा ढोरे आदी उपस्थित होते. या कार्यालयाचे उदघाटन दरमहा रुपये १२ लाख इतके भाडे आहे.
त्याविषयी भाषणात बोलताना पवार म्हणाले की, 'पैसा जनतेचा आहे. १२ लाख महिना प्रमाणे वर्षाला जवळपास दीड कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे परवडणारे नाही. त्या किमतीत एखादी इमारत उभारता येईल. त्यापेक्षा पुणे-मुंबई स्त्यावर लेबर ऑफिस आहे. इतर काही सरकारी ऑफिस बघून तिथे जागा मिळते का ते बघू असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांनाही त्यांनी यावेळी सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, ' अधिकाऱ्यांनी फार नियमावर बोट ठेवू नये. व्यवहारी मार्ग काढावा. एवढं चांगलं कार्यालय असल्यावर दर आठवड्याला आढावा घेणार आहे. किती प्रकल्प आले, किती काम झालं हे बघणार आहे. किरकोळ चूकही माफही करू. मात्र काम झालं नाही तर वेगळा विचार करावा लागेल. राज्यकर्त्यांच्या हातात अनेक गोष्टी आहेत. साईड पोस्टिंग पण आहे अशी तंबीही त्यांनी दिली.