अजित पवार ‘व्हीएसआय’ला आले, पण शरद पवारांसोबत दुरावा कायम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:44 IST2025-01-24T14:44:00+5:302025-01-24T14:44:33+5:30

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दालनात हजेरी लावली.

Ajit Pawar came to VSI but distance with Sharad Pawar remains | अजित पवार ‘व्हीएसआय’ला आले, पण शरद पवारांसोबत दुरावा कायम  

अजित पवार ‘व्हीएसआय’ला आले, पण शरद पवारांसोबत दुरावा कायम  

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठ टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी गुरुवारीही शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले. व्यासपीठावरील शरद पवारांशेजारील नावाची पाटी काढून त्याजागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना बसण्यास सांगत अजित पवार यांच्या फटकळ स्वभावाची प्रचिती गुरुवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमातदेखील आली. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीचे (शप) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांची जुळलेली केमेस्ट्री बरेच काही सांगून गेली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेल्या दोन वार्षिक सर्वसाधारण सभांना दांडी मारणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (दि. २३) ४८ व्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दालनात हजेरी लावली. त्याच वेळी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मात्र त्यापूर्वीच त्याच दालनात संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होेते. काही मिनिटांतच हे सर्व जण बैठकीला निघून गेले. यावेळीही शरद पवारांसोबत त्यांची चर्चा झाली नाही.

त्यानंतर शरद पवार यांच्या आगमनापूर्वी अजित पवार व्यासपीठावर हजर झाले. त्यावेळी त्यांची जागा शरद पवार यांच्याशेजारी राखीव ठेवण्यात आली होती. हे अजित पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांच्या पुढे असलेले संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांना जाब विचारत असे का करता म्हणत आपल्या नावाची पाटी हलवून शरद पवार यांच्या शेजारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची पाटी ठेवली. सबंध कार्यक्रमात त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली नाही.

याबाबत कार्यक्रमानंतर त्यांना विचारले असता ही काही बातमी होऊ शकत नाही असे सांगत पत्रकारांचीच फिरकी घेतली. नवे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत कार्यक्रमाला आले होते. त्यांना त्यांच्याशी बोलायचे होते त्यामुळे शरद पवार यांच्या शेजारी त्यांची पाटी ठेवली अशी सारवासारव त्यांनी केली. तर शरद पवारांसोबत काही चर्चा झाली का यावर कारखानदारीच्या विविध अडचणींवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

दरम्यान शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अजित पवार यांची जयंत पाटील यांच्याशी पूर्णवेळ रंगलेली चर्चा कार्यक्रमातील शेतकरी व कारखानदारांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरली. अधूनमधून हास्य, हातवारे करत नको तो विषय यावरून अजित पवारांची जयंत पाटलांशी जुळलेली केमेस्ट्री बरेच काही सांगून गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवार यांची सोबत टाळण्याचा कायमच प्रयत्न केला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या देहबोलीतील आत्मविश्वास बरेच काही सांगत असला तरी शरद पवार यांच्या सोबतचा दुरावा कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न ते अजूनही करत आहेत.

Web Title: Ajit Pawar came to VSI but distance with Sharad Pawar remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.