पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघाच्या लढतीची राज्यभर चर्चा होती. कारण इथे उभे लागली होती दोन कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजकारणातले दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा . एक होते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि दुसरे ते काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मग दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण म्हणतात ना राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात. तसेच काहीसे अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांसोबत करत दोघांमधील दुरावा मिटवण्याचे काम केले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ व दिग्गज नेते उपस्थित आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कल्लपण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. अजित पवारांनी नेमकी आपल्या प्रतिस्पर्ध्याला मित्रत्वाची साद घालण्याकरिता आवाडे यांच्या नावाची पाटी बाजूला सारुन पाटील यांची पाटी शेजारी ठेवत त्यांना शेजारी बसवून घेतले. त्यानंतर कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये हशा पिकला नसता तरच नवल. अजित पवार यांनी शेजारी बसवून घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत कार्यक्रम संपेपर्यंत विविध विषयांवर चर्चा करत गप्पा मारल्या. मात्र, संपूर्ण कार्यक्रमात हाच चर्चेचा विषयही झाला होता.दरम्यान, लोकसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर 8 महिन्यांच्यानंतर आज वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या सर्व साधारण सभेच्या निमित्ताने विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटले. मोहिते पाटील यांना स्टेजवर पाहताच शरद पवार यांनीही त्यांना जवळ बसवून घेतलं आणि त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली.
... असा मिटवला अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांसोबतचा दुरावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 2:18 PM
म्हणतात ना राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात...
ठळक मुद्देवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजितमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील नेते उपस्थित