केडगाव : जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे अ गटातून बिनविरोध निवडून येत सलग आठव्यांदा जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून निवडून आले आहेत. आज निर्धारित वेळेमध्ये भाजपचे अभिमन्यू गिरिमकर व राष्ट्रवादीचे अशोक खळदकर यांनी आपापले फॉर्म माघारी घेतल्याने थोरात यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. थोरात हे १९८५ पासून म्हणजेच गेली ३७ वर्ष सतत या बँकेच्या संचालक पदावर थोरात कार्यरत आहे. गेली सलग पाच वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत. या निवडीनंतर राष्ट्रवादी समर्थकांनी जल्लोष केला. पुणे येथे समर्थकांनी रमेश थोरात यांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. दौंड शहर केडगाव, यवत, वरवंड पाटस या परिसरामध्ये राष्ट्रवादी समर्थकांनी मिठाई वाटुन जल्लोष साजरा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून रमेश थोरात यांच्याकडे पाहिले जाते.
यावेळी रमेश थोरात म्हणाले, गट-तट विसरून गेली ३७ वर्षापासून तालुक्यातील व जिल्ह्यातील सभासदांची कर्ज वाटप करून सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच जिल्हा बँक देशामध्ये अव्वल बनली आहे. हा विजय सर्वसामान्य सोसायटी सभासद दौंड तालुक्यातील जनता, शेतकरी व मतदारांना समर्पित करतो.