उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्या गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:13 PM2021-07-06T12:13:55+5:302021-07-06T13:45:02+5:30
३१ मेला भर सायंकाळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केला होता
बारामती: माळेगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीसांनी सोमवारी रात्री माजी सरपंच जयदिप दिलीप तावरे यास अटक केली आहे.
३१ मेला भर सायंकाळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केला होता. घटनेच्या दिवशी रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. यावेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते.या घटनेनंतर बारामती शहरातील गिरीराज रुग्णालयात रविराज तावरे यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली. त्यानंतर रविराज तावरे यांना गेल्या महिन्यापासुन पुणे शहरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी माजी सरपंच जयदिप दिलीप तावरे यास अटक केली आहे. यापुर्वी पोलीसांनी अल्पवयीन मुलासह राहुल उर्फ रीबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना अटक केली आहे. माजी सरपंच तावरे यांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या पाचवर गेली आहे. तसेच, माजी सरपंच तावरे यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील धागेदोरे गावातील राजकारणापर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणातील तावरे यांचा नेमका सहभाग काय आहे, याची माहिती अद्याप पोलीसांनी दिलेली नाही.