"चंद्रकांत पाटील मोठे, अजित पवार छोटे..", असं का म्हणाले अजित पवार ? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:03 AM2022-01-26T11:03:39+5:302022-01-26T11:06:33+5:30
अजित पवार का असं म्हणाले ते जाणून घ्या...!
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वांनाच ठाऊक आहे. त्यानंतर आता जसजशी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे तसतसा या दोघातील राजकीय वाद वाढताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे कोरोना आढावा बैठकी वेळी विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. अजित पवारांनी त्यालादेखील प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते आमने-सामने आले आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांचा मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना पुणे ग्रामीणमध्येच पोपटाचा प्राण असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता मी अतिशय छोटा माणूस असल्याचे ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, "चंद्रकांत पाटील हे इतके मोठे आहेत की त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांसारख्या छोट्या व्यक्तीने टीका करणे बरोबर नाही. मोठ्या माणसांबद्दल मोठ्या माणसांनीच बोलावं. मी अतिशय छोटा माणूस असल्याचे सांगत त्यांनी यावर अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोध घेण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती तर आज वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.