...थेट अजित पवारांनी केले वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचं 'स्टिंग ऑपरेशन'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:04 AM2022-11-20T00:04:28+5:302022-11-20T00:06:20+5:30

कोट्यवधींचा खर्च करुन इतक्या प्रशस्त इमारती उभ्या करुनही रुग्णांना सेवाच मिळत नसेल तर अर्थ नाही, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

'Ajit Pawar' conducted the 'sting operation' of the medical college hospital. baramati | ...थेट अजित पवारांनी केले वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचं 'स्टिंग ऑपरेशन'

...थेट अजित पवारांनी केले वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचं 'स्टिंग ऑपरेशन'

googlenewsNext

बारामती -  वैद्यकीय  महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे  डॉक्टर दर शनिवारी सुटी घेतात, अशा तक्रारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे गेल्या होत्या. त्याची दखल घेत पवार यांनी थेट रुग्णालयाचेच ‘स्टिंग ऑपरेशन’ केले.पवार यांनी अचानक भेट दिली. कोणतीही सुट्टी नसताना एकही डॉक्टर कामावर हजर नसल्याचे पाहून पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

कोट्यवधींचा खर्च करुन इतक्या प्रशस्त इमारती उभ्या करुनही रुग्णांना सेवाच मिळत नसेल तर अर्थ नाही, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी बारामती दौऱ्यात दुपारी दोन वाजता बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात पवार अचानकच पोहचले. यावेळी  रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता हजर नाहीत म्हटल्यावर स्वत:च्या मोबाईलवरुन पवार यांनी  त्यांना फोन लावला. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आज सुटी आहे का? असा प्रश्न पवार यांनी  त्यांना विचारला. त्यावर आज सुटी नाही, असा खुलासा अधिष्ठात्यांनी केला. रुग्णालयाची स्वच्छता व इतर बाबींबद्दलही नाराजी व्यक्त करतानाच ऑपरेशन थिएटर, आयपीडी, आयसीयु युनिट, सीएसएसडी स्टरलायझेशन, वॉर्ड सुरु करणे या बाबी का प्रलंबित आहेत याचा जाबही त्यांनी अधिष्ठाता यांना विचारला.  

पवार यांनी कोणालाही कसली कल्पना न देता थेट रुग्णालय गाठल्यानंतर हा प्रकार उघड झाला.कोट्यवधींचा खर्च करुन सर्वसामान्यांसाठी शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करते. इतक्या प्रशस्त इमारती उभ्या करुनही रुग्णांना सेवाच मिळत नसेल तर अर्थ नाही, डॉक्टरच जागेवर नसतील तर रुग्णांवर औषधोपचार करणार कोण, असा सवाल करीत आगामी काळात मी स्वत: येऊन या सगळ्या बाबींचा आढावा घेणार आहे. प्रसंगी काही जणांना निलंबित करण्याची शिफारस करावी लागली तरी चालेल पण शिस्त लागायला हवी, असा  इशारा पवार यांनी दिल्याचे समजते. डॉक्टरांच्या आजच्या अनुपस्थितीबाबतही सविस्तर माहिती घेण्याची सूचना पवार यांनी त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील यांना केली. महाविद्यालयाचे अधीक्षक नंदकुमार कोकरे यांनी अजित पवार यांना माहिती दिली. बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील उपस्थित होते.

Web Title: 'Ajit Pawar' conducted the 'sting operation' of the medical college hospital. baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.