बारामती (पुणे): मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात काहींची भाषणं फारचं लाबंली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष गटाला टोला लगावला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला.
पवार पुढे म्हणाले, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली गेली. यासाठी एसटी बससेचा उपयोग केला गेला. मात्र, अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली होती.
'शिवसैनिकांनी योग्य निर्णय घ्यावा'
'मी दोघांचीही भाषणं ऐकली. पहिलं उद्धव ठाकरेंचं झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झालं. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं. यावर आम्ही जास्त टीका-टिपण्णी करण्याची गरज नाही. आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषतः शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. पुढे काय केलं पाहिजे, भूमिका काय असली पाहिजे, कुणाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे, याचा विचार त्यांनी करावा', असं अजित पवार म्हणाले.
'मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे'-
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या कमीपणामुळे गेला. राज्यात जे सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार केंद्रातही आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याने राज्यातील दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष हा आपल्यावर येईल, हे झाकण्यासाठी वक्तव्य केलं गेलं. विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प येतोय, हे भाषणात सांगितलं होतं. तुम्हीच आता टक्केवारीचा आरोप करताय, हे निरर्थक आहे. कोणी किती टक्केवारी मागितली हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं. झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा अस मी कधीही ऐकलं नाही. काल केलेली वक्तव्यं राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्व द्यायच नसते, असेही पवार यावेळी म्हणाले.