अजित पवारांचा निर्णय शॉकिंग; मी शरद पवारांबरोबरच, वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया
By राजू इनामदार | Published: July 2, 2023 03:50 PM2023-07-02T15:50:24+5:302023-07-02T15:51:33+5:30
Maharashtra Political Crisis - शरद पवार हे या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढतील असा वंदना चव्हाण यांचा विश्वास
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच खासदार वंदना चव्हाण यांनी मी शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे सांगितले आहे.
चव्हाण म्हणाल्या अजित पवार व अन्य आमदारांचा निर्णय शॉकिंग असल्याचे त्या म्हणाल्या. खासदार चव्हाण कार्यक्रमासाठी म्हणून सोलापूरात होत्या. लोकमत बरोबर बोलताना त्यांनी ठामपणे आपण शरद पवार यांच्याबरोबरच आहोत असे सांगितले. शरद पवार यातून नक्की मार्ग काढतील असा विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या, या घटनेनंतर माझे शरद पवार यांच्याबरोबर काहीही बोलणे झालेले नाही. पण ते व्हायलाच हवे असे मला वाटत नाही, कारण मी शरद पवार यांच्याबरोबरच आहे.
अजित पवार यांचा हा निर्णय ठरवून झाला असावा असे वाटण्याजोगी स्थिती आहे. थेट शपथविधी व्हावा हेही धक्कादायक आहे. शरद पवार यांना प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा याची चांगली माहिती आहे. त्यामुळे ते यातूनही मार्ग काढतील. खासदार सुनील तटकरे अजित पवार यांच्याबरोबर गेलेत, याकडे लक्ष वेधले असता खासदार चव्हाण यांनी यावर काहीच बोलायचे नाही असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत.