Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:50 PM2024-08-12T18:50:49+5:302024-08-12T18:51:51+5:30
महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा आता लोकांच्या हितासाठी लढतील
पुणे : देशात झालेल्या लोकसभेच्या रणधुमाळी नंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात झालीये. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा रंगली आहे. महायुतीतून अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर देवेंद्र फडणवीसच आता मुखमंत्री होणार असल्याच्या चर्चानाही उधाण आलंय. तर एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे दिसून आले आहे. तर महाविकास आघाडीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे यांचे मुखमंत्री पदाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे महविकास आघाडीतून ही नावे चर्चेत आली आहेत. याबाबत आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे
रोहित पवार म्हणाले, अजित दादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. महायुतीच्या सरकार मध्ये कोणाचा चेहरा ते आता पुढे करणार नाहीत. एकनाथ शिंदे साहेब यांची दिल्लीत चांगली पकड आहे. दिल्लीतले नेते त्यांचं ऐकतात. त्यांचा चेहरा आता मुख्यमंत्रीपदासाठी योग्य वाटतो. अजित दादा, देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे केला तर अडचण येण्याची शक्यता आहे. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. पुढेही त्यांचाच चेहरा असू शकतो. महाविकास आघाडीची पद्धत जुनी आहे. ते नाव जाहीर करत नाहीत. आता महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा आता लोकांच्या हितासाठी लढतील. असे मला तरी कार्यकर्ता नागरिक म्हणून वाटत आहे.
फडणवीस लाडकी बहीण योजनेचे नावच घेत नाहीत
एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना म्हणतात. अजित दादा माझी लाडकी बहीण योजना म्हणतात. पण देवेंद्र फडणवीस या योजनेचं नावच घेत नाहीत. हा गोंधळ मिटवावा. या गोंधळात त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत.
महायुतीत गेलेल्या गटांनी महाराष्ट्रासाठी काय आणलं?
आता महायुतीत अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट गेले आहेत. ते नवीन नेते महायुतीत आले आहेत. टोपी, गॉगल मास्क घालतात, लाडक्या खुर्चीबद्दल चर्चा करतात. लाडक्या महाराष्ट्राबद्दल कधीही चर्चा करत नाहीत. नितीश कुमार, नायडू यांनी त्यांच्या राज्यासाठी ७०,८० हजार कोटी आणले. आपल्या नेत्यांनी महाराष्ट्रासाठी फक्त भोपळाच आणला असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.