बारामती : गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. राज्यात राजकारणात अशा गोष्टी घडत नव्हत्या. साम दाम दंड भेद नीतीचा अवलंब करून सर्व गोष्टी अट्टाहासाने केल्या गेल्या. ध्येय डोळ्यासमोर ठेऊन यातूनच बंड झाले. राज्यातील महत्त्वाच्या नेत्याच्या पत्नीने माझा नवरा रात्री वेशभूषा बदलून बाहेर जात असल्याचे सांगितले, तर राज्यात घडलेल्या घडमोडींचा संबंध नसल्याने ते एकीकडे सांगतात, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
बारामती येथे नगरपालिका व माळेगांव बु. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळव्यात पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यळ इम्तियाज शिकीलकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगांव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.
मागील युती सरकारमध्ये त्यावेळी शिवसेनेला १२ मंत्रिपदे देण्यात आली होती. यामध्ये कॅबिनेटसह राज्यमंत्रिपदाचा समावेश होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांनीही भाजपकडून मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार करीत राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, तर भाजपने १०६ आमदार असताना उपमुख्यमंत्रिपद घेतले आहे. अशा पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे. आता ते नेमक्या कशा पद्धतीने हे काम करतात, हे आपण सर्व जण बघू या, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीला निधीवाटपाबाबत झुकते माप दिल्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच उदाहरण दिले. वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या योजनांचा दाखला दिला. निर्णय घेण्याचा अधिकार जिथे असतो, तिथे त्यांनी थोडेसे झुकते माप दिले, तर त्याबद्दल चुकीचे काही आहे असे नाही, शेवटी महत्त्वाच्या पदावर झुकते माप दिले जात असल्याचे पवार म्हणाले. लोक दोन्हीकडून बोलतात. संधी मिळूनही जर मतदारसंघासाठी काही केले नाही, तर तिकडूनही बोलले जाते आणि मतदारसंघासाठी काही केले, तर त्यावरही टीका केली जाते, त्यामुळे या टीकेला आपण फारसं महत्त्व देत नसल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार आणि अदानी यांचे मैत्रीचे संबंध
उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाने ६० हजार कोटी रुपयांचा कॉपर्स फंड निर्माण केला आहे. याचे व्याज आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास ३,६०० कोटी होईल. या पूर्ण रकमेची मदत देशातील वेगवेगळ्या संस्थांना ‘सीएसआर’च्या माध्यमातून करणार आहेत. देशाला हा निधी देताना बारामतीच्या वाट्याला काहीतरी निधी येईल. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अदानी यांचे मैत्रीचे संबंध आहेत. बारामतीकरांनी माझ्यासह ज्येष्ठ नेते पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागे निवडणुकीत नेहमीच ताकत उभा केली. त्यामुळे सर्व काही शक्य झाल्याचे अजित पवार म्हणाले.