Baramati Vidhan Sabha 2024: शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे म्हणत अजित पवारांनी ते फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:59 PM2024-11-20T17:59:08+5:302024-11-20T17:59:23+5:30
आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमकावले नाही, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसा काही प्रकार घडला असेल तर निवडणूक अधिकारी ठरवतील
बारामती : बारामती शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर या मतदान केंद्रावरील बोगस मतदानाचा आरोप झाल्यावर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानकेंद्रावर धाव घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शर्मिला पवार यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे असल्याचं म्हणत फेटाळून लावले. मला माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. बोगस मतदानाची निवडणूक आयोग तपास करतील. तक्रारीमध्ये काही तथ्य असायला हवे, उलट माझ्या पोलिंग एजंटला बाहेर काढल्याचं अजित पवार म्हणाले.
यावेळी मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमकावले नाही, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसा काही प्रकार घडला असेल तर निवडणूक अधिकारी ठरवतील. माझे कार्यकर्ते सुसंस्कृत महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी असे काहीही केले नाहीये. शर्मिला पवार यांचे आरोप धांदात खोटे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. उलट माझ्या बुथ प्रमुखाने मला सांगितले की, दादा मी आतमध्ये बसलेलो असताना त्यांनी मला बाहेर काढले, असे बाहेर काढण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्याला असतो.
मी पण माझ्या कार्यकर्त्यांना तक्रार द्यायला सांगतो. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असेल तर पोलीस तपास करतील आणि सत्य बाहेर येईल. मुळात म्हणजे या तक्रारीमध्ये काहीच सत्य नाहीये. सगळ्यांनी आचारसहिंतेचे पालन करावे. यासोबतच मतदान त्या तुलनेत कमी झालंय. लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, कोणत्याही उमेदवाराला मतदान करा पण मतदानाचा हक्क बजावावा, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. स्लीपबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्या कार्यकर्ते यांना मतदान केंद्रातून बाहेर काढणे चुकीचे आहे. आमचे कार्यकर्ते आचारसंहितेचे पालन करुनच काम करतात, असे पवार म्हणाले. तर उपमुख्यमंत्री पवार यांचे निवडणुक प्रतिनिधी किरण गुजर यांनी शर्मिला पवार यांनी मतदान केंद्रात जाण्यावर आक्षेप घेतला आहे. त्या उमेदवार,किंवा उमेदवार प्रतिनिधी देखील नाहीत,त्यामुळे त्या कोणत्या अधिकारातून मतदान केेंद्रात गेल्या,असा सवाल गुजर यांनी केला आहे.
बारामती विधानसभेतील काका पुतण्याची निवडणुक चांगलीच लक्षवेधी ठरली आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाकडून दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच मतदारांना घड्याळाच्या चिन्हाची बनावट स्लिप दिली जात असल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले होते. तसेच कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले होते.