अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात; अजितदादांविषयी सुरु चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:07 PM2023-05-06T18:07:34+5:302023-05-06T18:08:03+5:30

माझी विनंती आहे, अजित पवार यांच्या संदर्भात कोणतेही चुकीचे वृत्त पसरवू नका

Ajit Pawar does his work honestly Sharad Pawar put an end to the discussion about Ajit Dad | अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात; अजितदादांविषयी सुरु चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम

अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात; अजितदादांविषयी सुरु चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम

googlenewsNext

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. काही लोकांना फक्त काम करण्यात इंटरेस्ट असतो, तर काही लोकांचा वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याकडे कल असतो. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे बऱ्याचशा पत्रकारांना माहीत आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी सुरू असणाऱ्या चर्चांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पूर्णविराम दिला. शरद पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

पवार पुढे म्हणाले, अजित पवार यांचा स्वभाव लक्षात घेता ते कामाला प्राधान्य देतात. ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. दुसरी गोष्ट राजकारणात अथवा इतर कोठेही आपण एकमेकांना भेटतो. हे भेटणे म्हणजे त्याची राजकीय चर्चा होऊ शकत नाही. माझी विनंती आहे, अजित पवार यांच्या संदर्भात कोणतेही चुकीचे वृत्त पसरवू नका. ते त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत.

भाजपविरोधी राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत

देशात भाजपविरोधी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत देत विरोधकांच्या एकजुटीवरही पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, युती करण्यासाठी विविध विचारांचे सामाईक कार्यक्रम घेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच विरोधकांची एकजूट होईल. यासाठी आज नितीशकुमार काम करीत आहेत. आणखी काही लोकांचे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांना प्रोत्साहित करणे, सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. पण हे लवकर केले पाहिजे. कारण निवडणुका जाहीर झाल्यावर सर्व लक्ष तिकडे केंद्रित होते. त्याच्यापूर्वी पर्यायी लोकांना आपण उभे करण्याची आवश्यकता आहे. या कामात नितीशकुमार यांच्यासह आणखी लोक काम करीत आहेत. त्यांना सहकार्य करणे, प्रोत्साहित करणे, मदत करणे त्यात माझाही सहभाग असेल, असे पवार यांनी सांगितले. राज्यभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Ajit Pawar does his work honestly Sharad Pawar put an end to the discussion about Ajit Dad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.