अजित पवारांनी केला ‘त्या’ वादाचा खुलासा; मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 08:32 AM2024-08-16T08:32:46+5:302024-08-16T08:33:43+5:30
एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर अजित पवारांचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाइल्सवर केल्या जाणाऱ्या सह्यांवरून वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, ‘माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. सरकारमध्ये आम्ही सर्व जण एकोप्याने काम करत आहोत.
मागे पण काही जणांनी चुकीची बातमी दिली की मी वेशभूषा आणि नाव बदलून दिल्लीला गेलो होतो. मी कशाला नाव बदलू? आई-वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं आणि मला माझ्या नावाचा अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी परवा जळगावच्या कार्यक्रमात एकत्र गेलो, मुंबईलाही एकत्र आलो. विरोधकांना काम उरले नसल्याने त्यांच्याकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे,” असा पलटवार अजित पवारांनी केला आहे.
कॅबिनेट बैठकीत काय घडलं?
राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाइल्सवरील सह्यांवरून मोठा वाद झाल्याचे बोलले जात आहे. नगरविकास खात्याची फाइल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याने त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाइल्सवर मीही सह्या करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी संघर्षाच्या चर्चा फेटाळल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
जय पवार यांना उमेदवारी?
- बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगत आहे.
- अशातच पुण्यात अजित पवार यांनी मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘जय पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर आमच्या पक्षाचे पार्लमेंट्री बोर्ड त्याबाबतचा निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.