Ajit Pawar ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असे दोन तुल्यबळ उमेदवार आमने-सामने आल्याने अटीतटीची लढत रंगणार आहे. मतदारसंघातील जनसंपर्क आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रती लोकांमध्ये असलेली सहानुभूती, ही सुप्रिया सुळे यांची जमेची बाजू आहे. तर दुसरीकडे, पती अजित पवार यांची पक्षसंघटनेवरील पकड आणि विकास करणारा नेता अशी असलेली ओळख, या बाबी सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडणार आहेत. दोन्ही उमेदवार ताकदीचे असल्याने नक्की कोण जिंकणार, याबाबत राज्यासह देशभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आज अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचा दावा करत मताधिक्याचा आकडाही सांगून टाकला आहे.
बारामतीत तुम्हाला विजयाचा विश्वास आहे का, असा प्रश्न एका मराठी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "मी ज्या ज्या वेळी निवडणुकांमध्ये उतरतो, माझा आत्मविश्वास असतो म्हणूनच मी निवडणुकांमध्ये उतरतो. मी निवडणुकांमध्ये हरण्यासाठी कधीच उतरत नाही, जिंकण्यासाठीच उतरत असतो आणि या निवडणुकीतही मी काही लाखांनी जिंकणारच आहे," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बारामतीतून तीन टर्म खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांकडून मायक्रो प्लॅनिंग सुरू असल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अनेक सोसायट्यांमध्ये बैठका घेत सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांमधील राजकीय स्थिती काय?
१. बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून बारामती विधानसभा मतदारसंघातूनच आमदार म्हणून निवडून येत असल्याने येथील राजकारणावर त्यांची घट्ट पकड आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर बहुतांश पुढारी अजित पवारांसोबतच आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि धनगर समाजात चांगला संपर्क असणारे विश्वास नाना देवकाते यांचाही समावेश आहे.
२. इंदापूर
इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांची ठामपणे साथ दिली आहे. तर त्यांच्याविरोधात मागील दोन निवडणुकांमध्ये पराभूत झालेले हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये असले तरी महायुतीचा घटक म्हणून तेही अजित पवार यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचाच प्रचार करणार, हे सध्या तरी दिसत आहे. भरणे आणि पाटील कुटुंबाव्यतिरिक्त इंदापूर तालुक्यात दशरथ माने यांचं कुटुंब राजकीयदृष्ट्या शक्तीशाली समजलं जातं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दशरथ माने यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रवीण माने यांनीही पत्रकार परिषद घेत आम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
३. दौंड
दौंड तालुक्यात भाजपचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत, तर त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे हे दोन्हीही नेते सध्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. तसंच तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत अशा ठिकाणी निवडून गेलेले नेतेही महायुतीच्याच प्रचारात दिसत आहेत.
४. पुरंदर
पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत. ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय असले तरी माजी आमदार दादा जाधवराव, शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे अशी मातब्बर मंडळी महायुतीच्या बाजूने आहेत. ५. भोर-वेल्हा-मुळशी
भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन केलं होतं. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संग्राम थोपटे यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. तसंच या परिसरातील राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारीही पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत गेले आहेत. तसंच शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे यांनीही महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे.
६. खडकवासला
या मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. तसंच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यादेखील याच खडकवासला भागातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवाराला राजकीय ताकद मिळणार आहे.