बारामती/पुणे - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीवर प्रेम आहे, अन् बारामतीमधील लोकांचंही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे. म्हणून, लाखांच्या फरकाने येथील लोकं त्यांना निवडून देतात. याच आपल्या जन्मभूमीत गेल्यानंतर आज अजित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आयटी विभागाने अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर, जवळच्या नातेवाईकांच्या मालमत्तीवर धाडी टाकल्यानंतरचा त्यांचा आज पहिलाच बारामती दौरा होता.
बारामती येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तसेच, बारामतीमधील एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमालाही त्यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यावेळी, उपस्थित महिलांनी अजित पवारांचं कौतुक केलं. 'अजितदादा तुमचं काम एक नंबर आहे. तुम्ही खूप छान काम करता. तुम्ही खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा, आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत, असे या महिलांनी म्हटले. त्यावेळी, अजित पवारांनी हात जोडून आभार मानले. यावेळी, ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
आयटी विभागाने टाकलेल्या धाडीनंतरही, येथील महिलांनी अजित पवारांच्या कामाचे कौतुक करत आम्ही तुमच्यासोबत आहोत, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, अजित पवार भावूक झाल्याचे दिसून आले. 'तुम्ही निवडून देता म्हणून मी काम करतो,' असे म्हणत हात जोडून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मास्क वापरा, लस घ्या
मास्क वापरालाच पाहिजे. मी फक्त पाणी पिताना, जेवन करतानाच मास्क काढतो. माझं अनुकरण तुम्ही करावे यासाठी मी मास्क सातत्याने वापरत आहे. तिसरी लाट आली की आम्हाला नकोनको होते. मी हे पोटतिडकीने ऐवढ्यासाठी सांगत आहे की, कोरोना (corona) वाढला की आम्हाला विकास कामांचा सगळा निधी कोरोना उपाययोजनांमध्ये खर्च करावा लागतो. शेवटी माणसाचा जीव वाचवणे हे प्रथम कर्तव्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. आता, लसीकरण मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलग ७५ तास लसीकरण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात आले. झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. काल पुणे येथील कोरोना आढावा बैठकीमध्ये देखील (house to house) लसीकरणाचा सर्व्हे तसेच लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.