पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुण्यातून काँग्रेसही लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. तर भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेडने आपला उमेदवारही जाहीर केला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पोटनिवडणुकीविषयी तुम्ही अजित पवार यांना विचारा असं ते म्हणाले आहेत. यावरून पोटनिवडणुकीची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आल्याचे दिसून येत आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आज सकाळी चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्व पक्षांनी निवडणूक लढवणार हे सूचित केल्यानंतर भाजपने तयारी सुरू केली आहे. निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार असून आम्ही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध केली. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली जाणार असल्यामुळे आम्ही गाफील राहणार नाही. इच्छुक उमेदवाराची नावे पाठवण्यात येणार असून त्यातील तीन नावे निवडून विचार केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेड लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून सर्व पक्ष निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न करणार आहेत.
असा आहे इतिहास
कसबा विधानसभा मतदारसंघ मागील अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात आहेत. सलग ५ वेळा तिथून भाजपचे गिरीष बापट विजयी झाले. त्यांच्याही आधी अण्णा जोशी, त्याआधी अरविंद लेले या भाजपच्याच उमेदवारांनी तिथून निवडणूक जिंकली होती. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी लोकसभेची निवडणूक जिंकली व ते खासदार झाले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर प्रथमच पोटनिवडणूक झाली.
काय झाले होते पोटनिवडणुकीत?
काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय. तो पोटनिवडणुकीत मिळाला होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच सुरू झाली आहे.
निवडणूक २०१९ ची
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा मुक्ता टिळक यांनी भाजपकडून पराभव केला. शिंदे यांना ४७ हजार २९६ मते मिळाली. मुक्ता टिळक यांनी ७५ हजार ४९२ मते मिळवली. शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांना १३ हजार ९८९ मते मिळाली. मुक्ता टिळक यांचा निवडणुकीत सहज विजय झाला होता. त्याच जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे.
आयोगाकडून दे धक्का
निवडणूक आयोगाकडून लगेचच या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भाजपच काय, पण अन्य राजकीय पक्षांमध्येही ही जागा लढविण्याबाबत किंवा उमेदवार निश्चित करण्याबाबत काहीच चर्चा नव्हती. मात्र, बुधवारी आयोगाने अचानक कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा रीतसर कार्यक्रमच जाहीर केला. त्यामुळे आता उमेदवारी कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे.