Ajit Pawar ( Marathi News ) : पुणे- काल भाजपची लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत ७२ उमेदवारांची नावे जाहीर केली. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विखे यांच्या विरोधात आमदार निलेश लंके लोकसभा लढवणार अशी चर्चा सुरू आहे. आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करुन उमेदवारी घेणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिक्रीया दिली आहे.
'आज काय होणार असेल तर....; निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे दिले संकेत
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, निलेश लंके यांना मी पक्षात घेतले. त्यांना विकास कामांसाठी मी मदत केली आहे. मी मनापासून आधार दिला, काल लंके माझ्याकडे आले होते त्यांना मी सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. पण, त्यांच्या डोक्यात काही लोकांनी खासदार होण्याची हवा घातली आहे. पण वास्तविक तसं नाही आहे. ते फक्त पारनेसाठी काम करु शकतात. बाकीच्या मतदार संघात त्यांना सोप वाटतं तसं नाही, म्हणून मी त्यांना हा निर्णय घेऊ नको म्हटलं होतं. आता मी समजावून सांगण्याच काम होतं ते केलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, निलेश लंके तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांनी काल एका मंत्र्याबंद्दल तक्रार केली. मी त्यांना म्हणालो तुम्ही, मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊया. समज गैरसमज झाले असतील ते सोडवूया. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी आता वेगळं काहीतरी केलं तर त्यांना राजिनामा देऊनच निर्णय घ्यावा लागेल, असंही पवार म्हणाले.
आमदार निलेश लंकेंनी काय सांगितलं?
आमदार निलेश लंके म्हणाले, माझा कोणीही विरोधक नाही, मी कामाला महत्व देणारा माणूस आहे. दुसरा कोण काय करतोय या गोष्टीकडे लक्ष देत नाही. काम करत राहतो, आम्ही अडीच वर्ष सत्तेत होतो. मी सामाजिक काम करतो. अजित पवार आमचे नेते आहेत. लोकसभेसाठी माझं अजून काहीही ठरलेलं नाही. कार्यकरर्त्यांचा आग्रह काय आहे हे अजून मी पाहिलेलं नाही. लोकांची भावना काय आहे हे पण तपासले पाहिजे. जनतेचं मत काय आहे हे पाहणं गरजेचं आहे, राजकारणात वेळ बघून निर्णय घ्यायचे असतात, असंही आमदार निलेश लंके म्हणाले.
"आज माझ्या नियोजनात कोणत्या पक्षात प्रवेश करायचं असं काही नाही. मतदार संघात उद्घाटन आहे. आज जर काही होण्याची चिन्ह असतील तर तुम्हाला पहिला कॉल करेन. आज पुस्तकाचं प्रकाशन आहे. कोरोना काळातील अनुभव त्यात लिहिला आहे, विकासाचा फायदा हा सर्वसामान्यांना होत असतो. विरोधक काय बोलतात यापेक्षा लोक काय बोलतात हे महत्वाचं असतं, असा टोलाही आमदार लंके यांनी खासदार सुजय विखे यांना लगावला.