श्रीनिवास पवार-युगेंद्र पवारांचा घाव वर्मी बसला; अजित पवारांनी सर्वांसमोरच दिला आक्रमक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 08:16 PM2024-04-09T20:16:54+5:302024-04-09T20:19:19+5:30
अजित पवारांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार हेदेखील सुळे यांच्या प्रचारात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर टोकदार शब्दांत निशाणा साधला होता.
Baramati Lok Sabha ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथील पदाधिकारी मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या प्रचारात सहभागी असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांवर घणाघाती टीका केली आहे. अजित पवारांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार हेदेखील सुळे यांच्या प्रचारात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर टोकदार शब्दांत निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आजच्या आपल्या भाषणात कुटुंबातील सदस्यांना आक्रमक इशारा दिला आहे.
श्रीनिवास पवार यांच्यावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले की, "माझी भावंड माझ्या निवडणुकीला कधी कुठे फिरली नाहीत, पण आता मात्र गरागरा फिरत आहेत. अरे तुमचा भाऊ उभा होता, तेव्हा नाही वाटलं का रे फिरावं? पण हे सगळं औटघटकेचं आहे. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात, तशा या छत्र्या उगवल्या आहेत. मी तोलून-मापून बोलतोय म्हणून ते काहीही बोलायला लागले आहेत. मी जर तोंड उघडलं तर यातील अनेकांना लोकांमध्ये फिरता येणार नाही, तोंड दाखवायला जागा राहणार नाही," असा आक्रमक इशारा अजित पवारांनी दिला आहे.
"निवडणूक झाली की हे लोक जातील परदेशात फिरायला. कारण त्यातील बऱ्याच जणांना परदेशातच जायला आवडतं. निवडणुकीनंतर त्यातील कोणंच तुमच्या कामाला येणार नाही. तुमच्या कामाला मीच येणार आहे," असंही अजित पवार आजच्या आपल्या भाषणात म्हणाले.
श्रीनिवास पवार नक्की काय म्हणाले होते?
श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला होता. "तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मी अजितदादांच्या विरोधात कसा बोलतोय. मी नेहमी दादांसोबत राहिलो. चांगल्या काळात, वाईट काळात पण मी त्याची साथ दिली. तो म्हणेल तशी मी तिथे उडी मारली. त्याने जे जे निर्णय घेतले त्याला साथ दिली. कधी मी त्याला विचारले नाही की असे का? पण जेव्हा आमची चर्चा झाली, तेव्हा मी त्याला म्हटले आमदारकी तुझ्याकडे आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. गावकरी म्हणून सगळ्यांना माहीत आहे. साहेबांचे वय आता ८३ झाले, त्यांना सोडणे मला पटले नाही. माझे काही मित्र म्हणाले आता इथून पुढे दादांची वर्षे आहेत. साहेबांची काही नाहीत. तो विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. का तर आपण पुढची १० वर्षे दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, याच्यासारखा नालायक माणूस नाही, असे माझे वैयक्तिक म्हणणे आहे," असं श्रीनिवास पवार म्हणाले होते.