पुणे/मुंबई - पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या धडाडी कार्याचं कौतूक केलं. तर, रुपाली ठोंबरे यांनीही अजित पवारांच्या कार्यशैलीमुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं म्हटलं होतं. रुपाली पाटील यांनी पक्ष सोडताना मनसेबद्दल काहीही विधान केलं नाही. मात्र, लोकमतशी बोलताना त्यांनी गेल्या 14 वर्षांत मनसेत आपल्या कामाची दखल घेण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.
रुपाली पाटील यांनी पक्षांतरानंतर अजित पवार यांचे सातत्याने कौतुक केले असून भाजपा नेत्यांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. नुकतेच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे नेटीझन्सने त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. जरा दमानं, धीर धरा... असे म्हणत काहींनी त्यांना नेते अजित पवार यांच्याबद्दलचं कौतुक अतिशयोक्ती असल्याचा टोला लगावलाय. आता, पुन्हा एकदा रुपाली ठोंबरे यांनी अजित पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
मी 14 वर्षे मनसेमध्ये रस्त्यावर उतरुन केलेल्या कामाची दखलही त्या स्वपक्षाती कुठल्याही भावाने घेतली नाही. परंतु, तीच दखल अजित पवार यांनी घेतली, त्यांनी लहान बहिण म्हणून जो मान-सन्मान दिला, विश्वास दिला त्याची उतराई मी कधीही करू शकत नाही. मी पक्ष सोडताना कुणालीही, ना मनसैनिकांना वाईट बोलले ना कुणाला. केवळ दोन जणांचा स्थानिक प्रश्न होता, तो मग महिलांनी बोलायचंच नाही का? असा प्रश्न रुपाली ठोंबरे यांनी लोकमतशी बोलताना विचारला.
चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका
पंतप्रधान पदावरुन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावरुन, ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. ''शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही. पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा..! असे म्हणत रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.''