मुंबई/पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावात ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर, आज बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अजित पवारांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली.
बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती शहरात मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्य पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. यावेळी, अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणीच या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा अशा घोषणांनी बारामतीचा मोर्चा दणाणून गेला होता. मराठा बांधवाकडून आज बारामती बंदची हाक देण्यात आली असून मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. बारामती व्यापारी महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या बारामती बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.
काटेवाडीतही निधेष, राजीनाम्याची मागणी
काटेवाडीत संभाजी बिग्रेड प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे म्हणाले, जालना येथील सर्वस्वी घटनेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. या ठिकाणी आंदोलनावर अमानुषपणे बेधुंद लाठी हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली. लहान मुले, पुरुष, महिला यांना देखील सोडले नाही. आमचा पोलिसांवर रोष नाही. वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले. मात्र त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे. सरकारने पोलीस बळाचा वापर करून अमानुषपणे केलेला लाठीहल्ला हा सर्व प्रकार चीड आणणारा असून मराठा समाजाच्या भावना दुखवणारा आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे संभाजी बिग्रेडचे प्रदेश कोषाध्यक्ष काटे यांनी सांगितले.