पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या सडेतोड, नर्मविनोदी शैलीत उत्तरे देण्यात पटाईत आहेत. सध्या ते राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत आहेत. आठवड्यातून एक दिवस ते पुण्याच्या प्रश्नांसाठी वेळ देताना दिसत आहेत. अशावेळी ते कामाच्या नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेतून देतात. सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हायपरलूपच्या प्रश्नांवर दिलेले उत्तर ऐकून मात्र एकच हशा पिकला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्याला मिळालेल्या सरकारने विकास कामांसाठी निधी वाटपाच्या माहितीकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी इतर मुद्द्यांवर बोलून झाल्यावर त्यांना हायपरलूपचे काय झाले असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर ते म्हणाले की, '' हायपरलूपची ट्रायल कुठे झाली असेल तर आपणही करू. जर्मनी, जपान, चीन किंवा पाकिस्तान कुठे तरी ट्रायल झाली आहे असेल तर मला दाखवा. तुम्ही जर हायपरलूपचे पुरस्कर्ते किंवा तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर आपण जाऊ, त्यात प्रवास करून बघू. १५ मिनिटात मुंबईतून पोचायचे झाल्यास माणूस जसा बसला तर उतरायला तर हवा ना, त्याला रुबी हॉस्पिटलला नेण्याची वेळ येऊ नये. आयुष्याला गती आली आहे, चांगल्या योजनेची गरज आहे असे जरी असले तरी त्याचे तिकीट निदान विमानापेक्षा कमी असायला हवे' असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
एनआरसी आणि सीएएच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :याबाबत देशातील वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी मते आहेत.काही राज्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, केरळ, पश्चिम बंगाल ,पंजाब या राज्यातही भाजप विरोधी सरकार आहे. आपल्याकडे महाविकास आघाडी सरकार आहे,पण आमची ही भूमिका आहे की, 'सध्या तरी यामुळे सामान्य जनतेला त्रास होऊ नये' अशीच आहे.