अजित पवार हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, आयुष्यभर फक्त जमिनी लाटण्याचं काम केलं; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:54 PM2022-02-08T18:54:39+5:302022-02-08T18:56:06+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. अजित पवार यांनी आयुष्यभर फक्त पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पुणे-
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. अजित पवार यांनी आयुष्यभर फक्त पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पुण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं फक्त जनतेला लुटण्याचं काम केल्याचा आरोप करत अजित पवारांवर हल्लाबोल केला.
अजित पवार हे हेलिकॉप्टरनं जमिनी शोधण्याचं काम करतात, कुणाची जमीन शिल्लक आहे का पाहतात. धरणाचीही जमीन सोडत नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये अजित पवारांबाबत भीती आहे की यांना जर जमीन दिसली तर त्यावर आरक्षण आणून तीही जमीन लाटतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पुण्याच्या मांजरी गावातील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
"आज देशात अडाणी म्हाताऱ्या व्यक्तीलाही कळालं आहे की मोदी थेट बँक खात्यात सहा हजार रुपये देतात. मग तो आता मोदींना मत देणार की पवारांना? यांनी फक्त आयुष्यभर लोकांचे पैसे काढून घेण्याचं काम केलं. जमिनी काढून घेण्याचं काम केलं. मला असं कळलं की मांजरी गावाला काहीवर्षांपूर्वी महापालिकेत दाखल करुन घेण्यात येत होतं तेव्हा गावकरी नको म्हणाले कारण पवार आमच्या जमिनी लाटतील अशी भीती होती. पवार आमच्या जमिनीवर आरक्षण टाकतील आणि त्या लाटतील अशी भीती लोकांमध्ये होती. अजित पवार हेलिकॉप्टरमधून फिरतात आणि फक्त कुणाकुणाच्या किती जमिनी शिल्लक आहेत ते पाहात असतात. धरण सुद्धा सोडत नाहीत", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येताना दिसत आहे तसं अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील द्वंद्व तीव्र होताना दिसत आहे. दोघांमध्ये आरोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील यांनी थेट जमिनी लाटण्याचा आरोप केल्यानं अजित पवार आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.