पुणे : पुण्यात सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने ‘गोल्डन जुलै’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हजर होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्याने अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर मागील वर्षभराच्या कालावधीत शरद पवार यांनी राज्यभरात दौरे करून अनेक आजी माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवार यांना उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देखील मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
राजकीय कार्यक्रम नसल्याने मी उपस्थित राहिलो
आमदार चेतन तुपे म्हणाले, ‘गोल्डन जुलै’ हा कार्यक्रम राजकीय नव्हता. त्यामुळे मी उपस्थित राहिलो. यावेळी शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. सातारा जिल्हा मित्रमंडळाचा स्नेहमेळावा असल्याने मी आलो. याच कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मला निमंत्रण दिले होते. मी हडपसरचा आमदार आहे. या वानवडी परिसरात हा कार्यक्रम असल्याने मी हजर होतो.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्यासाठी साताऱ्याने अनेक त्याग केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक लोक सातारा जिल्ह्यातील होते. सातारा जिल्ह्याने अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी दिले. राज्याचे पाहिले मुख्यमंत्रीदेखील सातारा जिल्ह्याचे होते. इंग्रजांच्या काळात सातारकरांनी त्यांना विरोधाची भूमिका घेतली. माझ्या पूर्वजांनी सातारा जिल्ह्यात शेती केली. त्यामुळे केवळ तुम्ही नाही, तर मी पण सातारकर आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.