अजित पवार गटाच्या आमदाराने गायले शरद पवारांचे गुणगान; जुन्नरच्या राजकारणात नवा व्टिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:46 PM2024-08-26T13:46:22+5:302024-08-26T13:46:57+5:30

प्रेम प्रेम असतं, प्रेम तराजूमध्ये मोजायचं नसतं, जिथे पवार साहेब असतात, तिथे जास्त बोलायचं नसतं

Ajit pawar group MLA sings praises of Sharad Pawar A new Vtist in Junnar politics | अजित पवार गटाच्या आमदाराने गायले शरद पवारांचे गुणगान; जुन्नरच्या राजकारणात नवा व्टिस्ट

अजित पवार गटाच्या आमदाराने गायले शरद पवारांचे गुणगान; जुन्नरच्या राजकारणात नवा व्टिस्ट

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी जुन्नर दौऱ्यावर होते. यावेळीही अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर एका कार्यक्रमात जुन्नरचे भाग्यविधाते माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या स्मारकाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करणार आहे. सत्ता, साधन संपत्ती ही लोककल्याणासाठी वापरायची असते, अशी शिकवण साहेब आणि वल्लभ बेनके यांनी दिली असून, जिथे पवार असतात तिथे जास्त बोलायचे नसते, असे म्हणत आमदार बेनके यांनी शरद पवार गटात जाण्याचे संकेत दिले. दरम्यान, यामुळे संपूर्ण जुन्नरचे राजकारण ढवळून निघाले आहे. पवारांच्या खेळीमुळे बेनके अस्वस्थ झाले असल्याचेही पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक आमदारांना अजित पवार गटात सामील होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका आमदार अतुल बेनके यांनी घेतली होती. तेव्हापासून शरद पवार यांनी जुन्नरवर विशेष लक्ष दिले आहे. आतापर्यंत त्यांनी चार वेळा जुन्नर दौरा केलाच पण त्यावेळी त्यांनी काही संकेतही दिले. त्यामुळे आमदार अतुल बेनके अस्वस्थ आहेत. ज्या ज्या वेळी शरद पवार दौऱ्यावर आले, त्या त्या वेळी ते स्वत:हून त्यांच्या स्वागतासाठी आमदार बेनके हजर राहिले आहेत. काही वेळा त्यांना लवकर भेट दिली नाही. पण, तरीही ते मागे हटले नाहीत. काही ना काही करून पवारांची त्यांनी भेट घेतल्याचेच पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या उमेदवाराची आमदार बेनके यांनी स्वत: धुरा सांभाळत शरद पवार गटावर जहरी टीका केली. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी तीन वेळा जुन्नर दौरा करत उमेदवाराची चाचपणी केली, तर दुसरीकडे भाजप व शिंदे गटाकडूनही अजित पवार गटाला अपेक्षित असे सहकार्य मिळत नसल्याने आमदार अतुल बेनके अस्वस्थ झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर आमदार अतुल बेनके यांच्या जवळचे काही कार्यकर्ते आणि मित्र बारामती येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन अतुल बेनके यांना जुन्नरमधून उमेदवारी देण्याबाबतचे विनंती केली असल्याचे कळते, त्यावेळी शरद पवार यांनी तो माझ्या विश्वासू मित्राचा मुलगा आहे. त्याला मला भेटायला सांगा, नंतर बोलू, असे त्यावेळी सांगितले होते. दरम्यानच्या काळात बेनके यांनी अत्यंत जवळचे मित्र आमदार रोहित पवार यांच्याबरोबरही जवळीकता वाढवली. नारायणगाव येथील निवासस्थानी दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाल्याचे सुत्रांनी सांगितले. इतक्या सगळ्या घडामोडी सुरू असताना रविवारी शरद पवार पुन्हा जुन्नर दौऱ्यावर आले. यावेळी आमदार बेनके यांनी शरद पवारांच्या स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले. त्यांचं स्वागत केलंच, पण नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहचले, तेंव्हा ते स्वतः तिथं हजर होते. त्यानंतर एका कार्यक्रमात श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन निवृत्तीशेठ (शेठबाबा) शेरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले, सहकारमहर्षी, माजी आ. शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. माजी आ. झांबरशेठ तांबे, माजी आ. लताताई तांबे, शिक्षणमहर्षी विलास तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते होत आहे. जुन्नरचे भाग्यविधाते, माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या स्मारकाचे उद्घाटनही शरद पवार यांच्याच हस्ते करणार, असे सूचक वक्तव्य अतुल बेनके यांनी केले. प्रेम प्रेम असतं, प्रेम तराजूमध्ये मोजायचं नसतं, जिथे पवार साहेब असतात, तिथे जास्त बोलायचं नसतं, असे म्हणत त्यांनी शरद पवार गटाचे गुणगाण गायिले. त्यामुळे पवार गटात जाणार असल्याचे संकेतच बेनकेंनी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमोल कोल्हेंबरोबर विकासासाठी कटिबद्ध

लोकसभा निवडणुकीत आमदार अतुल बेनके यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, आजच्या कार्यक्रमात मताच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणातून पुढे जायचं, ही शिकवण जोपासली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये डॉ. अमोल कोल्हे हे खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहिलो आणि येथून पुढेही डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबर पुढे जाण्यासाठी विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेत बेनकेंच्या घरवापसीसाठी जो विरोध केला होता. त्यावर आता डॉ. कोल्हेंची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Ajit pawar group MLA sings praises of Sharad Pawar A new Vtist in Junnar politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.