Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची इनकमिंग सुरु; शरद पवारांच्या भेटीने राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:45 IST2024-10-16T16:43:29+5:302024-10-16T16:45:08+5:30
लोकसभा निवडणूक निकालात वरचष्मा राहिल्याने शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्यासाठी अजित पवार गटातील अनेक नेत्यांची चढाओढ

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची इनकमिंग सुरु; शरद पवारांच्या भेटीने राजकीय घडामोडींना वेग
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक शिलेदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची पुण्यातील ‘मोदीबाग’ या निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे बंधू डाॅ. अमोल बेनके, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असल्यामुळे या भेटीगाठीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
लोकसभा निवडणूक निकालात वरचष्मा राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी अजित पवार गटातील अनेक नेत्यांची चढाओढ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शेकापचे जयंत पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीमध्ये जावे, असे त्यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह होता. त्यानुसार तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या पवार भेटीमुळे ते महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा सुरू झाली.