पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारही आज सकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावरून मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन यामागचं कारण सांगितलं आहे.
शरद पवार म्हणाले, अजित पवार हे नेहमीच दिल्लीला जात असतात. दिल्लीला मी पण गेलो ते पण गेले आणि जयंत पाटील पण गेले होते. पण अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच त्यांची तिकडं बैठक झाली आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा अधिकार त्यांना आहे. मला नियोजन काय ते अजून माहिती नाही. आम्हाला लवकरच माहिती मिळेल. आम्ही पक्षाचे वरिष्ठ ६ जुलैला संघटनात्मक बांधणीबाबत बैठक घेणार आहोत. त्यावेळी आम्हाला अजित पवारांच्या बैठीकीबाबत कळेलच असे शरद पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.
अजित पवारांच्या सूचना विचार घेणार
सुप्रिया मुंबई वरुन पुण्याला यायला निघाल्या आहेत. ज्यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का यावर विचार होणार आहे. अजित पवारांनी काही सूचना दिल्या आहेत त्या देखील विचारात घेतल्या जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.