Nana Patole: अजित पवार यांच्याकडे नैतिकता राहिलेली नाही; नाना पटोलेंचे खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 01:34 PM2023-08-13T13:34:33+5:302023-08-13T13:35:24+5:30

शरद पवार नक्कीच इंडिया आघाडीबरोबर राहतील, याचा विश्वास

Ajit Pawar has no morals Nana Patole words | Nana Patole: अजित पवार यांच्याकडे नैतिकता राहिलेली नाही; नाना पटोलेंचे खडेबोल

Nana Patole: अजित पवार यांच्याकडे नैतिकता राहिलेली नाही; नाना पटोलेंचे खडेबोल

googlenewsNext

पुणे : दोन महिन्यांपूर्वीची अजित पवार यांची भाषणे काढून पाहा. त्यात ते काय म्हणतात व आता काय म्हणत आहेत ते ऐका. अजित पवार यांच्याकडे आता कसलीही नैतिकता राहिलेली नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात खडेबोल सुनावले.

पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये शनिवारी दुपारी विरोधकांच्या इंडिया या आघाडीची बैठक झाली. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. शरद पवार, अजित पवार यांच्या कथित भेटीबाबत विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. मित्रपक्षांत काय सुरू आहे, तिथे काय घडते आहे, हा त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. मित्रपक्ष असला तरीही त्यांच्याकडे अशा गोष्टींवरून लक्ष देण्याची गरज नाही. शरद पवार नक्कीच इंडिया आघाडीबरोबर राहतील, याचा विश्वास आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत आघाडीच्या वतीने राज्यातील जनतेमध्ये महागाई, बेरोजगारी याबरोबरच केंद्र सरकार, भाजप कसे सामाजिक वातावरण खराब करीत आहे, याविषयी जागृती निर्माण करण्यात येईल, असे पटोले यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘डीआरडीओ’मधील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये सापडले. पाकिस्तानला देशाची गुपिते पाठविली म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावणे आवश्यक होते; मात्र त्यांना त्यातून वाचविण्यासाठीच देशद्रोहाच्या कायद्यातील कलम रद्द करण्याचे विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत मांडले, असा आरोप पटोले यांनी केला. जनता या सर्व गोष्टींबाबत भाजपला मतपेटीतूनच उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षातील एका कार्यकर्त्याने पटोले यांच्या आगमानावेळीच काँग्रेस भवनच्या लॉबीत अंगात काळा पोशाख घालून उभा होता. त्यावर निषेधाचे शब्द लिहिले होते. पक्षातील अशा गटबाजीबाबत विचारले असता पटोले यांनी, काही नेत्यांची मी म्हणजेच पक्ष अशी भूमिका योग्य नसल्याचे सांगितले. आगामी काळात यात नक्की सुधारणा दिसेल, असे सांगत त्यांनी शहरात काही बदल होणार असल्याचे संकेतही दिले.

Web Title: Ajit Pawar has no morals Nana Patole words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.