Ajit pawar in Pune: अजित पवार कार्यकर्त्यांशी साधत होते संवाद, तेवढ्यात मशिदीतून आला अजानचा आवाज...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:32 PM2022-03-14T12:32:53+5:302022-03-14T12:33:26+5:30
Ajit pawar in Pune: पुणे शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काल पुण्यात आले होते.
पुणे: पुणे महानगरपालिकेची मुदत आज संपणार आहे. तत्पुर्वी पुणे शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) काल पुण्यात आले होते. यावेळी नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उदघाटनाची लगबग दिवसभर पाहायला मिळाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
काल खराडी येथील ऑक्सिजन पार्कच्या भूमिजनाला अजित पवार, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार सुनील टिंगरे आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना, जवळच्या मशिदीमधून अजान सुरू झाली. मशिदीतून अजानचा आवाज आल्याने अजित पवारांनी मध्येच आपले भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर त्यांनी आपले भाषण चालू ठेवले. त्यांच्या या कृतीची सध्या चर्चा होत आहे.
'कधीही निवडणुका होऊ शकतात'
पुणे दौऱ्यात अजित पवारांनी आगामी निवडणुकांबाबत मोठी माहिती दिली. ओबीसी आरक्षणा रद्द झाल्यामुळे निवडणूक लागू नये यासाठी राज्य सरकारने कायद्यान्वये प्रभाग रचनेचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. सध्याची प्रभाग रचना रद्द झाली आहे, आता निवडणूक कमीत कमी 6 महिन्यांसाठी पुढे गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र निवडणुका सहा महिने पुढे गेल्या असे काही सांगता येत नाही. पुढील काही दिवसात, महिन्यात अचानक निवडणुका जाहिर होऊ शकतात, असे अजित पवार म्हणाले.
'पुन्हा आम्हाला दोष देऊ नका'
याशिवाय अजित पवारांनी यावेळी प्रभाग रचनेच्या चर्चांना पूर्णविराम दिला. काही दिवसांपासून राज्यात प्रभाग रचना पुन्हा 2 सदस्यीय होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत ते म्हणाले, प्रभाग 2 सदस्यीय होणार या चर्चांना काही अर्थ नाही. प्रभाग रचना तीन सदस्यीयच राहणार आहे. निवडणुकीला किती दिवस बाकी आहेत, ते आताच सांगता येणार नाही. पुन्हा मला दोष देऊ नका. नाहीतर आम्हाला फसवलं राव, असं म्हणालं, असेही पवार म्हणाले.