शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:53 IST2025-02-28T16:52:52+5:302025-02-28T16:53:54+5:30
मंत्रालयातील बैठकीत शिक्षक संघास आश्वासन

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार
बारामती - राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात प्राथमिक शिक्षक संघासोबत घेतलेल्या बैठकीत दिल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणीचे स्वागत व प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात ही बैठक संपन्न झाली. यावेळी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्यासह राज्यसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली, प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित बिलांसाठी निधी उपलब्ध करून देणे, सर्व शिक्षक कांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, एम एस सी आय टी परीक्षेस मुदतवाढ देण्यात यावी व वेतनातील वसुल केलेली रक्कम परत मिळावी.
मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी, शिक्षण सेवकांना नियमित वेतन देण्यात यावे, मुख्याध्यापक पदवीधर केंद्रप्रमुख पदांची पदोन्नती तात्काळ करण्यात यावी अ, ब, क, ड वर्ग नगरपालिका व ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांचे संपूर्ण वेतन शासनाकडून व्हावे यांसह इतरही मागण्या शासनाकडे करण्यात आल्याची माहिती, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
नव्या शिक्षकांची वेतनत्रुटी दूर करा...
२०१६ नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांची वेतन त्रूटी दूर करण्यासाठी खुल्लर समितीचा अहवाल तपासावा मात्र शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होण्यासाठी २ वेतनवाढी मंजूर करण्याचा अंतिम निर्णय शासनाने घ्यावा अशी शिक्षक संघाची मागणी आहे.
शिक्षकांच्या मागण्या...
शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना
सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी,
विषय शिक्षकांच्या पदास संरक्षण
मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख रिक्त पदे भरणे
सचिवस्तरावर बैठकीचे आयोजन....
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे अर्थ, ग्रामविकास, शिक्षण, नगर विकास व आरोग्य या विभागांमध्ये वर्गीकरण करून पुढील महिन्यात तातडीने सर्व विभागांच्या प्रधान सचिवांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयास दिल्या आहेत.