बारामती : वडिलांसमवेत बारामती एमआयडीसीत फिरण्यासाठी आलेल्या मुलीने अचानक विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पाहणी करताना पाहिले. मात्र, तिने पवार यांच्याबरोबर फोटो काढण्याचा हट्ट वडिलांकडे केला. वडिलांनी नकार देऊन देखील ती पवार यांना भेटली. त्यानंतर पवार यांनीदेखील तिचा हट्ट पुरवत तिच्याबरोबर फोटो काढले.
तिचे वडील सचिन रणवरे यांनी हा किस्सा फोटोंसह सोशल मीडियावर ‘शेअर’ केला आहे. नुकताच पवार यांचा दौरा पार पडला. रणवरे हे त्यांची दोन्ही मुले मनू आणि कृष्णराजसमवेत संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नवीन झालेल्या गदिमा सभागृह ते पेन्सिल चौक रस्त्यावर फिरत होते. यावेळी पवार हे त्याच ठिकाणी रात्री १० वाजता नवीन रस्त्याची पाहणी करीत होते.
यावेळी मनू हिने पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी वडिलांकडे आग्रह धरला. परंतु त्यांनी मनूला ‘आता दादा अधिकाऱ्यांसोबत रस्त्याविषयी चर्चा करत आहेत’,असे सांगितले. तसेच तिने तो हट्ट सोडावा यासाठी प्रयत्न केला; पण तिने हट्ट सोडला नाही. ती गदिमा सभागृहाच्या कोपऱ्यापासून ते विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पवार यांच्यासमवेत बाजूला चालत राहिली. प्रवेशद्वारावर पवार थांबले. यावेळी तिने एवढ्या गर्दीतून पुढे जाऊन फोटो काढण्यासाठी दादांना विनंती केली. यावेळी तिचे वडील मनातून धास्तावले होते; परंतु पवार यांनी अतिशय आपुलकीने जवळ घेत मनू व कृष्णराज सोबत फोटो काढले. त्या दोघांना शाब्बासकीची थाप दिल्याचे रणवरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.