पुणे - बारामतीच्या पवार कुटुंबीयांच्या कौटुंबिक कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत असते. राजकारणात असतानाही कुटुंबाने जपलेला एकोपा नेहमीच कौतुकास्पद ठरला आहे. नुकतेच कृषी विकास प्रतिष्ठानच्या ऑलिम्पिक जलतरण तलाव उद्घाटनाचा कार्यक्रम पवार कुटुंबीयांच्या किश्श्यांनी गाजला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तर, अजित पवारांनी दादास्टाईल फटकेबाजी करत उपस्थित विविध संस्थांच्या चेअरमन आणि खासदार सुप्रिया सुळेंनाही शरद पवारांसमोरच ऐकवल्याचं पाहायला मिळालं.
बारामतीमध्ये बनविण्यात आलेल्या जलतरण तलावाचं आणि त्याच्या क्वॉलिटी व किंमतीचं गणित अजित पवारांनी मांडलं. या जलतरण तलावासाठी, डायरेक्ट कुठं कुठं साहेबांच्या ओळखी असतील, आमच्या ओळखी असतील. तिथून टाईल्स असेल, सिमेंट असेल, किंवा स्टील असेल ते आणण्याचा प्रयत्न केला. ७ कोटी रुपयांचं काम ५ कोटी रुपयांत केलं, तेही दर्जेदार. कुणीही तिथं जाऊन एखादी चूक दाखवावी की इथं कमी झालंय, मी तुमचं म्हणेल ते ऐकेल. इथ बसलेल्या अनेक संस्थांच्या चेअरमनला मला हे आवर्जून सांगायचंय, असे म्हणत कार्यक्रमात उपस्थित अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावलं. तसेच, नुसतं चेअरमनपद भूषवायचं नाही, अशी काटकसर करायची, असा सल्लाही दिला.
इंदापूरमध्ये दत्ता भरणे हेही करणार आहेत, पण आता तिथं काटकसर कोण करणार. तिथं कोण बघणार. मार्गदर्शन तू इथून करशील दररोज तिथं येणार आहे का? असा सवाल अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना विचारला. तसेच, उंटावरुन शेळ्या राखून चालणार नाही, इथं जशी टीम आहे तशीच टीम इंदापूरमध्येही करावी लागेल. आपण ती करू, आव्हान स्विकारण्याची आपली तयारी आहे, एकट्या बारामतीत करुन चालणार नाही, सगळीकडे झालं पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटलं. आपण बारामतीमध्ये जे करतो, त्याकडे दिल्लीवाल्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेच, ते इंथ येऊन पाहतात, काय चाललंय, असे म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टिकाही केली.
राजूदादा आणि रोहितभाऊ दिसतात
आमदार रोहित पवार यांचे वडील व अजित पवार यांचे थोरले बंधू आजच्या कार्यक्रमाचे आयोजक असणाऱ्या कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन आहेत. अजितदादांच्या या फटकेबाजीतून राजेंद्र पवार ही सुटले नाहीत. त्यांना उद्देशून पवार म्हणाले, आज तर काय जीन्सची पँट, टी शर्ट, बूट बिट घातलेत. माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, पण मीच मोठा दिसतोय आणि हा लहान दिसतोय. आता ‘तू’ आणि रोहित भाऊ भाऊ दिसतात. कुंती काय करायचं सांग, वहिनी कुठे गेल्या. आम्हाला सांगतच नाहीस, गप्प बसतोस, तू एकटं एकटं सगळं करतोस. मला, सुप्रियाला आणि रोहितला पण जरा सांग काय काय करायचं ते, आमचा फायदा काहीतरी कर, आम्ही तुझं तू सांगशील ते सगळं ऐकू, असं म्हणताच पुन्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.