चूक लक्षात येताच अजित पवारांना आवरेना हसू; बारामतीत कार्यकर्त्यांनाही भरला दम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:07 AM2023-03-28T09:07:49+5:302023-03-28T09:08:25+5:30
अजित पवार बारामती येथे कार्यकर्त्यांना उद्देशून, पक्षावाढीसाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठीच्या संदर्भात भाषण करत होते
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या परखड आणि स्पष्टवक्तेपणामुळे महाराष्ट्राला परिचीत आहेत. अजित पवारांची प्रशासनावरील पकड नेहमीच चर्चेचा आणि कौतुकाचा विषय असतो. त्यासोबतच, विधिमंडळ सभागृहात होणारी त्यांची भाषणंही लक्षवेधी असतात. नुकतेच, राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अधिवेशनातही विरोधी पक्षाने सरकारला वेगवेगळ्या विषयांवर घेरले. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनीही अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र, सभागृहातील याच भाषणाची सवय अजित पवारांच्या बारामतीच्या सभेतही जाणवली.
अजित पवार बारामती येथे कार्यकर्त्यांना उद्देशून, पक्षावाढीसाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठीच्या संदर्भात भाषण करत होते. मात्र, यावेळी, कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना त्यांच्या सभागृहातील भाषणाची आठवणच सर्वांना झाली. कारण, उपस्थितांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, अध्यक्ष महोदय... मग एकच हशा पिकला. विशेष म्हणजे अजित पवारांनाही यावेळी हसू आवरले नाही. सॉरी... काय करावं सभागृहातील भाषणाची सवय झालीय, असे म्हणत अजित पवारांनीही चूक झाल्याचे स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांना सूचना
मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अजित पवारांनी काही सूचना केल्या. त्यामध्ये, तालुक्यातील वेगवेगळ्या कुटुंबीयांशी कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवावा, पण फक्त समन्वय ठेवा, बाकीचं काही करू नका. नाहीतर माझ्याकडे तक्रारी येतील, तुमचा माणूस येतोय आणि वेगळच काहीतरी करतोय. फोनवर, व्हॉट्सअप, फिट्सअप काही करू नका, हे मला चालणार नाही. मी अजिबात ते खपवून घेणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काही सूचनाही केल्या आहेत.