राष्ट्रवादीतील वरिष्ठांच्या चुकीमुळेच मुख्यमंत्रिपदाची गेली संधी, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:58 AM2023-02-04T07:58:42+5:302023-02-04T07:59:20+5:30
Ajit Pawar : काँग्रेस आघाडीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्रिपद मिळविता आले नाही. ही पक्षातील वरिष्ठांची सर्वांत मोठी चूक होती, अशी कबुली विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी दिली.
पिंपरी : काँग्रेस आघाडीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्रिपद मिळविता आले नाही. ही पक्षातील वरिष्ठांची सर्वांत मोठी चूक होती, अशी कबुली विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी दिली. त्यावेळी आमच्या वरिष्ठांपैकी कोणालाही मुख्यमंत्री केले असते तरी चालले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘लोकमत’च्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड अचिव्हर्स अवॉर्ड वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पवार उपस्थित होते. त्या वेळी ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राज्यातील सत्तांतर, विधान परिषदेचे निकाल व पोटनिवडणूक याविषयी पवारांनी दिलखुलास संवाद साधला.
आतापर्यंतच्या राजकारणात कोणत्या चुका झाल्या नसत्या तर बरे झाले असते का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ते सांगण्यात आता अर्थ नाही. एक मात्र मोठी चूक वाटते. ती म्हणजे २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडायला नको होते. मी खोटे सांगत नाही. त्यावेळी आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचे होते किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात जे होते त्यांना मुख्यमंत्री करायचे होते; पण २००४ ला जर मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर त्यात शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता.
सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या, तरी मुख्यमंत्रिपद न घेण्याचा निर्णय कोणी घेतला? या प्रश्नावर पवार म्हणाले, आम्ही त्यावेळी ज्युनिअर होतो. मधुकर पिचड, प्रफुल्ल पटेल, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते हे वरिष्ठ नेते निर्णय प्रक्रियेत होते. त्यांनी सांगायचे आणि आम्ही जी म्हणायचे, अशी परिस्थिती होती. आपण कितीही काही म्हटले तरी प्रयत्न करणे आपल्या हातात असते; पण कुठेतरी नशिबाची साथ लागते. देशातही पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसे होती आणि आहेत; पण सगळ्यांनाच ते पद मिळते का? अगदी महापौरपद, मुख्यमंत्रिपद असेल. सगळ्यांच्या ठिकाणी नशिबाची साथही आवश्यक असते.
वंचित ‘मविआ’त आल्यास विजय
वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेशी युती केली आहे, त्यांचे काय? असे विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांच्या काही उमेदवारांनी लाखभर मते घेतली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत वंचित आले तर महाराष्ट्रामध्ये वेगळे चित्र निर्माण होईल. ‘मविआ’सोबत वंचितने यावे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
...म्हणून आमचे सरकार पडले
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काय बिनसले होते, या प्रश्नावर पवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना आमदारकीचा आणि मंत्रिमंडळाचा अजिबात अनुभव नव्हता. ते दिल्लीत पंतप्रधानाच्या कार्यालयातील काम बघायचे. पण, दिल्ली आणि राज्यातील राजकारणात खूप अंतर असते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असताना दुर्दैवाने काही असे प्रसंग निर्माण झाले, आम्ही एकमेकांना साथ देण्याऐवजी काहींना आमचे विरोधक जवळचे वाटले. त्याचा फटका बसून नंतर सरकार पडले, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला.
सत्यजीतने सर्व विसरून काँग्रेससाेबत राहावे
मुलाखतीच्या सुरुवातीलाच पदवीधर निवडणुकीच्या अनुशंगाने प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले की, भाजपला जबरदस्त धक्के देणारा हा निकाल आहे. नाशिकमधील विजयी उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मागील दीड महिन्यातील सर्व घटनाक्रम विसरून पुन्हा काँग्रेसचे सहयोगी आमदार म्हणून राहावे, असा माझा वैयक्तिक सल्ला आहे. ताे ऐकावा की नाही, हा सर्वस्वी सत्यजीतचा निर्णय आहे.
आत्याबाईला मिशा असत्या तर...
मुख्यमंत्रिपदाची गेलेली संधी २०२४ मध्ये आल्यावर काय कराल? या प्रश्नावर ते म्हणाले, आत्याबाईला मिशा असत्या तर काय झाले असते, असे म्हटल्यासारखे हाेईल. त्यापेक्षा झाल्यावर दाखवितो मी काय करीन ते. या गमतीदार उत्तरावर सभागृहात हशा पिकला.