Ajit Pawar: " महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही, आमचं सरकार स्थिर!"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:53 PM2021-04-16T19:53:06+5:302021-04-16T20:00:56+5:30
अजित पवारांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर
पुणे : पंढरपूर आणि मंगळवेढा येथील पोटनिवडणुक होत आहे. तिथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. याच दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ''महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे"अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असू. निवडणुका आयोगाने लावल्या तर, आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच आहे. निवडणुका लावल्यावर घरातुन तर प्रचार होऊ शकत नाही.आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. आम्हालाही अनेकदा वाटतं की निवडणुका लागायला नको. थोड्या नंतर किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तरी चाललं असतं.
राजकीय मी बोलत नाही. केंद्राने व्हॅक्सिन एक्सपोर्ट करायची गरज नव्हती. रेमडेसिविर निर्यातीची गरज नव्हती. पण असं म्हणलं की मी राजकीय बोलतो अशी टिका करणार असाही टोला पवार यांनी यावेळी लगावला.