पुणे : शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण पुणे हादरले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्याकडून होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश (pune police) पुणे पोलिसांना दिले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुलीला श्रद्धांजलीही वाहिली आहे.
पवार म्हणाले, ''पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे.''
''शाळेत शिकणाऱ्या कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.''
एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता
क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. काल सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. ज्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला. दरम्यान आरोपी जवळ पिस्तूल देतील असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु गुन्हा करत असताना त्याला ते काढता आले नाही. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.