येड्या बाभळी काढायलाही आम्ही पवार कुटुंबीयच येतो, अजित पवार यांच्या नगराध्यक्षांना कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:12 AM2019-02-09T00:12:50+5:302019-02-09T00:13:21+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) बारामती येथे खासगी इमारतीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वाढलेल्या येड्या बाभळीच्या झाडावरून नगराध्यक्षांना कानपिचक्या दिल्या.
बारामती - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) बारामती येथे खासगी इमारतीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वाढलेल्या येड्या बाभळीच्या झाडावरून नगराध्यक्षांना कानपिचक्या दिल्या. ‘येड्या बाभळी काढायलाही आम्ही पवार कुटुंबीयच येतो,’ अशा शब्दांत पवार यांनी वाढलेल्या येड्या बाभळीच्या झाडावरून दिलेल्या कानपिचक्या या वेळी चर्चेचा विषय ठरला.
माजी उपमुख्यंमत्री पवार स्वच्छतेबाबत दक्ष असतात. याबाबत संबंधितांना सुनवण्यासदेखील ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या परखड स्वभावाचा बारामतीकरांनी आज पुन्हा एकदा अनुभव घेतला. आज बारामतीत पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होते. अशाच एका गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पवार यांना एका जागेत मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढलेली दिसली, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आता इथे समोरच येड्या बाभळी उगवल्यात. बारामतीकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपण एका कंपनीकरवी जेसीबी उपलब्ध करून दिलाय ना? मग त्या येड्या बाभळी काढा ना.. का आता मी आणि साहेब येऊन थांबून येड्या बाभळी काढू..? आता तेवढंच राहिलंय.. आणि सुप्रियाला सांगतो बघ निघाल्यात का बाभळी, ज्यांनी- त्यांनी आपली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे.. आमची काही अपेक्षा नाही. आम्ही लवकर उठून कामाला लागतो. पण त्या कामातून रिझल्ट दिसलेच पाहिजेत, असं सांगत पवार यांनी नगराध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. शहरातील परिसरासह सर्वच शासकीय कार्यालयांमध्येही स्वच्छता राहिली पाहिजे, अशी सूचना केली.
....तेव्हापासून आपण या दोघांनाही चिडूच देत नाही
शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला. त्यावर कोटी करताना अजित पवार यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.
एसटी नाही मिळाली म्हणून श्रीनिवास आणि त्यांचे मित्र चंद्रवदन हे दोघे चालत काटेवाडीला गेले होते. तेव्हापासून आपण या दोघांनाही चिडूनच देत नाही. पुन्हा राग आला आणि ते जर कन्याकुमारीपर्यंत चालत गेले तर आपलं कसं होईल, असा सवाल पवार यांनी मिश्कीलपणे उपस्थित केला. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
...या विषयाबाबत काहीच माहिती नाही
महाराष्ट्राची विधानसभा येत्या २८ फेब्रुवारी रोजी बरखास्त करणार असा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पानंतर विधानसभा बरखास्तीची घोषणा करण्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखविली होती. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार असल्याचाही दावा चव्हाण यांनी केला होता.
याबाबत बारामतीत एका कार्यक्रमात अजित पवार यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी या विषयाबाबत काहीच माहिती नाही, असे स्पष्ट केले. अधिक विचारले असता आपल्याला हा विषयच माहिती नसल्याचे पुन्हा सांगत याबाबत अधिकचे बोलणे त्यांनी टाळले.