पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्शभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तातडीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदे घेतली. त्यात हॉटेल, बार, शासकीय आणि खासगी आस्थापनामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जाईल. घेतले नसतील तर अशा व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. याची सक्त अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती दिली.
लशीचे दोन्ही डोस घेतले तरच आता सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाईल. यापूर्वीही अनेकदा याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. परंतु आजवर याचे पालन झाले नाही. आता मात्र याची अंमलबजावणी केली जाईल, असं पवार यांनी सांगितले. या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आज पुणे शहरात 1 हजार 104 कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले तर कोरोनाचा धोका कमी असतो. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. तसेच रंगीबेरंगी, कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरण्याऐवजी थ्री लेअर किंवा N95 मास्क वापरावा. साधे मास्क टाळावे असे आवाहनही पवार यांनी केले.