Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 05:30 PM2024-09-02T17:30:01+5:302024-09-02T17:30:40+5:30
महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा, असं कोणालाच वाटणार नाही
बारामती : मालवण तालुक्यात काही महिन्यांपुर्वी बसविलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेल्या ठिकाणी नुकसान झालं. दुर्दैवी घटना घडली. घडायला नको होते ते घडलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत. तिथ महाराजांच्या नावाला साजेसा स्मारक उभारणार आहे. मी झालेल्या घटनेबद्ल महाराष्ट्रातल्या १३ कोटी जनतेची माफी मागितली. या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांचा शाेध घेवुन त्यावर शासन कारवाई करेल. मात्र,याप्रकरणी मुख्यमंत्री आणि आम्हा दोघा उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जाेडेमारो आंदोलन केले. अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर समोर या, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
बारामती येथे आयोजित जनसन्मान यात्रेच्या सभेत पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, हा कसला रडीचा डाव, याबाबत राजकारण करु नका. महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा, असे कोणत्या सरकारला वाटेल, असं कोणालाच वाटणार नाही. त्यात वेगवेगळ्या पध्दतीने राजकारण आणलं जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसने आंदोलन याबाबत तपास लावण्याची मागणी केली आहे. या घटना महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीत. सगळ्या समाजाने गुण्यागोविंदाने नांदायचे,जातीय सलोखा ठेवायचा आहे. कालच्या लोकसभेच्या निमित्ताने देखील काही समाजातील लोक बाजुला गेले.घटना,संविधान,आरक्षण बदलणार असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे तो समाज नाराज झाला,सगळ्या जातीधर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे,हि राष्ट्रवादीची भुमिका आहे.या भुमिका घेवूनच आम्ही पुढे चाललो आहोत,याबाबत खात्री बाळगा,असे पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले, जनतेचा सन्मान करण्यासाठी हि जनसन्मान यात्रा आहे.अनेक महिलांना या योजना माहिती नाहीत. आजपर्यंत १ कोटी ६० लाख महिलांना मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी या योजनेचा लाभ दिलेला आहे. काहीजण टीका करतात. काहीजण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. त्यांना माझा सवाल सर्वसामान्य महिलांना १५०० रुपये महिना मिळत असतील तर बिघडलं कुठ. त्या महिलांचा तो हक्क आहे. १५०० रुपयांत काय होणार,अशी टीका विरोधक करतात. सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्यांना गरीबी काय समजणार,आम्ही गरीबी बघितली आहे. बारामतीकरांना माहिती आहे, अशा शब्दात पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. यावेळी खासदार सुनील तटकरे,सुनेत्रा पवार,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,पार्थ पवार,जय पवार,प्रदीप गारटकर,किरण गुजर, सचिन सातव,दिगंबर दुर्गाडे,केशव जगताप,प्रशांत काटे,पुरुषोत्तम जगताप,सुनील पवार,विक्रम भोसले,पोपट गावडे,विश्वास देवकाते,संपत देवकाते आदी उपस`थित होते.
काहीजण म्हणतात,बारामतीत आता वेगळंच वाटतंय,पूर्वी एवढे ‘पवार’ घरी येत नव्हते. आता सगळेच ‘पवार’ विचारपुस करायला लागलेत. गेल्या २५ ते ३० वर्षात कोणी आले नव्हते. काय रे बाबत कसं आहे. तुझं नीट आहे ना, जे पवार केवळ मत मागत होेते. ते घरोघरी दारोदारी फिरायला लागले. सगळेच पवार हे पण आणि ते पण सगळेच पवार फिरायला लागलेत. हरकतं नाही,तो तुमचा मान आहे.तुम्ही मतदार राजा आहांत. तुम्ही ठरवायंच आहे,काय करायचं,तो तुमच अधिकार आहे. त्याच्या खोलात मी जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.