मुख्यमंत्री असले म्हणजे काय झाले, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:53 PM2022-08-05T19:53:20+5:302022-08-05T20:02:04+5:30

अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका...

ajit pawar on cm eknath shinde loud speakers continue till half past two in the night | मुख्यमंत्री असले म्हणजे काय झाले, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत- अजित पवार

मुख्यमंत्री असले म्हणजे काय झाले, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत- अजित पवार

Next

बारामती : आम्ही जेव्हा पदावर असतो, तेंव्हा आम्ही नियम मोडून चालत नाही. नियमाने रात्री दहाच्या पुढे लाऊड स्पीकर बंद ठेवणे आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्री फिरत असताना रात्री दीड- दोन वाजेपर्यंत स्पीकर चालू असतो. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारी अधिकारी व्यक्तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उशीरापर्यंत होत असलेल्या दौऱ्याबाबत  टोला लगावला.

सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष गट वाढवण्याचे अधिकार आहे. मात्र, संविधानाने सांगितलेल्या अधिकाराप्रमाणे त्याचे पालन केले पाहिजे. मग ती सामान्य व्यक्ती असो की उच्चपदस्थ, प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार करीत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. या दोघांवर इतका भार आला आहे की मुख्यमंत्री आजारी पडायला लागले आहेत. हे मी चांगल्या भावनेने नमुद करत आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचे पवार म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता तर कामाची वाटणी झाली असती. संबंधित मंत्री आपापल्या भागात काम करत राहिले असते. पूर परिस्थितीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सचिव आम्हाला आदेश पाहिजे, असे सांगतात. मात्र आदेश देणाऱ्या सर्व खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अद्याप कुठलेही खाते नसल्याचे पवार यांनी सांगितले.

...त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरं
कदाचित याबाबत निकाल काय लागेल माहित नसल्याने मंत्री मंडळ विस्तार होत नाही की काय अशी शंका येत असल्याचे सांगितले. बंड केलेल्या आमदारांनाही तुम्हाला मंत्री करतो, असे सांगितले असावे. त्यामुळे देखील विस्तार होत नसेल. त्यामुळे कोणाला मंत्री, कोणाला राज्यमंत्री तर भाजपच्या ही १०६ आमदारांना वाटतं की आपल्यालाही मंत्रिपद मिळायला पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरं, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

...त्यांना निवडणुक खर्च कसा परवडणार
राज्यातील काही बाजार समित्यांची फी भरण्याचीही ऐपत नाही. राज्यातील ६० ते ६५ टक्के बाजार समित्यांना पगार देताना ओढाताण करावी लागते. त्या बाजार समित्या निवडणुक खर्च कसा भागविणार, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. याबद्दल सभागृहात मत मांडणार असल्याचे देखील पवार म्हणाले.

Web Title: ajit pawar on cm eknath shinde loud speakers continue till half past two in the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.