बारामती (पुणे): सरकार स्थापन करुन महिना पूर्ण होत आला आहे. तरीही मंत्रीमंडळ स्थापनेला मुहुर्त मिळत नाही. लोकांचे अनेक प्रश्न रखडले आहेत. आता जनतेनेच पाहावे राज्यात कशा प्रकारे कारभार सुरु आहे आणि याला कोण जबाबदार आहे, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते शुक्रवारी (दि. ५) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात त्यांचा जनता दरबार पार पडला. नागरीकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना पवार यांनी सूचना दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली.
यावेळी विधान सभा विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. गावातील रस्ते, पुलांची दुरावस्था झाली आहे. तातडीने त्यांना मदतीची गरज आहे.
याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून राज्यमंत्री मंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पावसाळी अधिवेशन जुलैमध्येच होते. ऑगस्ट महिना उजाडला तरी पावसाळी अधिवेशन घेण्यात आलेले नाही. त्यांना ग्रीन सिग्नल मिळेना, त्यांच्यात एकवाक्यता होईना. मंत्रीमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, हे काही समजायला तयार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.