बारामती: हनुमानाच्या शेपटीप्रमाणे ‘जरांडेश्वर’च्या मालकीची यादी वाढतच आहे. जरांडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि. कंपनी कोणाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारखान्याच्या मालकाचे नाव घोषित करावे. चालक कोण आहे हे जगाला माहिती आहे. पवार परिवाराने बेनामी कारखाने पदाचा गैरवापर करून घेतलाचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी बारामती येथे परीवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी बुधवारी(दि ६) भेट दिली. यावेळी भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. सोमय्या यांनी हा कारखाना विकत घेण्यासाठी त्यांनी बेनामी पद्धत का वापरली, गुरू कोमोडीटी सर्व्हीसेस प्रा.ली. ला अजित पवार यांनी साखर कारखाना घेण्यासाठी ६५ कोटी रुपये मागील दराने दिल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. या सगळ्या बाबींचा तपास व्हायलाच हवा. तसेच या सगळ्याचा जाब पवार परिवाराने द्यावा. ठाकरे सरकार चे ४० घोटाळे समोर आले आहेत. आतापर्यंत २६ घोटाळ्यांची तक्रार आपण केली आहे. यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि ४ अधिकाऱ्यांसह १६ जणांच्या तक्रारींचा समावेश असल्याचे सोमय्या म्हणाले.
आज जरांडेश्वर कारखान्याला भेट देताना गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांच्या लोकांनी गुंडागर्दी करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. हा प्रकार झेड सिक्युरिटी आणि पोलीस प्रशासनाने ‘नोट’ केल्याचे सोमय्या म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरिट सोमय्या यांचे नाव न घेता टीका केली. त्यांनी कारखाने चालवायला घ्यावेत आणि चालवून दाखवावेत. मग कळेल कारखाना चालविणे अवघड असतं, अशा शब्दांत पवार यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आज बारामतीत बोलताना सोमय्या यांनी अजित पवार यांना बेनामी कंपन्यांवर घोटाळ्यांवर न बोलता विषय बदलण्याचा त्यांचा प्रयत्न केला असल्याचा टोला लगावला.