पुण्यातून अजितदादांचं पारडं जड; जाणून घ्या 'कोणत्या आमदाराचा पाठिंबा कोणाला'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:52 PM2023-07-05T19:52:59+5:302023-07-05T19:53:40+5:30
शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा प्रबळ गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याचे स्पष्ट
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३२ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत. त्यानंतर आज मुंबई येथे बुधवारी पार पडलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या बैठकांनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात सुद्धा या महाबंडानंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी शरद पवार तर काही अजित पवार यांच्यासोबत असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण ९ आमदार आहेत. त्यापैकी ५ आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला असून आजच्या बैठकीत ते दिसून आले आहेत. तर १ खासदार आणि २ आमदारांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. अजित पवार स्वतः बारामतीचे आमदार आहेत. तर इतर दोघांनी अजूनही कोणतीच भूमिका जाहीर न केल्याचे सांगितले आहे. या नाट्यसत्तांतरामध्ये पुण्यातून अजित पवारांचे पारडं जड असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. शहरातही हा अंदाज घेण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी तातडीची कार्यकारिणी बैठक घेतली होती. मात्र या बैठकीकडे शहरातील विद्यमान आमदार, बहुतांशी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीला खासदार ॲड. वंदना चव्हाण, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष जयदेव गायकवाड, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, कमल ढोले पाटील, माजी नगरसेवक ॲड.निलेश निकम, श्रीकांत पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, निलेश मगर, रविंद्र माळवदकर, काका चव्हाण आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान शहराध्यक्ष जगताप यांनी २३ माजी नगरसेवक बैठकीला आल्याचा दावा केला होता. मात्र सदर बैठकीला शहरातील आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी नगरसेवक दीपक मानकर, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, महेंद्र पठारे, दिलीप बराटे, दत्तात्रेय धनकवडे, कुमार गोसावी आदी प्रमुख पदाधिकारी यांनी पाठ फिरवली. तसेच प्रमुख कार्यकर्ते मतदार संघनिहाय अध्यक्ष व अन्य पदाधिकारीही यावेळी अनुपस्थित होते. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा प्रबळ गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
शरद पवारांना पाठिंबा देणारे आमदार
- आमदार अशोक पवार (शिरूर)
- आमदार चेतन तुपे (हडपसर)
अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार
- आमदार दिलीप वळसे पाटील (आंबेगाव तालुका)
- आमदार दिलीप मोहिते पाटील (खेड - आळंदी)
- आमदार दत्तात्रय भरणे (इंदापूर)
- आमदार सुनील शेळके (मावळ)
- आमदार सुनील टिंगरे (वडगाव शेरी)
कोणतीही भूमिका जाहीर न केलेले आमदार
- आमदार अतुल बेनके (जुन्नर)
- आमदार अण्णा बनसोडे (पिंपरी)