पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखठोक शैलीसाठी चर्चेत असतात. कोरोना काळात स्वयंशिस्तीचे दर्शन घडवितानाच अजितदादा कधी कधी नियमांचे पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांना चारचौघात चार खडे बोल सुनावण्यात देखील मागे पुढे पाहत नाही असेेही अनेकवेळा घडले आहे. आजदेखील पुण्यात एका कार्यक्रमावेळी अजितदादांनी कार्यकर्त्याचे विनोदात्मक शैलीतुन चांगलेच कान टोचले. तसेच कोरोनाच्या भीतीने पुष्पगुच्छ नाकारला.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी(दि. २१) कोरोना आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. अजित पवार पुण्यात म्हटले की कार्यकर्ते ओघाने ठरलेलेच असतात. कोरोना आढावा बैठकीपूर्वी विधान भवन आवारात ऑक्सिजन सिलेंडर, कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी चार चाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, याहीवेळी नेहमीप्रमाणे कार्यकर्ते अजित पवार यांची भेट घेण्यास आले होते.
यावेळी त्यातलाच एक कार्यकर्ता दादांना म्हणाला, दादा, तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, आरे बाबा, काही तरी नियम पाळा, कोणाकडून पुष्पगुच्छ आणला. त्याला कोरोना झाला असेल किंवा नाय काय माहिती? पण जरा काळजी घ्या...असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार बैठकीसाठी मार्गस्थ झाले.
१० दिवसांनंतर परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय राज्यात म्युकोरमायकॉसिसचा इंजेक्शन चा तुटवडा आहे. इंजेक्शन चा वितरणाचे सर्व अधिकार मात्र केंद्राने आपल्याकडे घेतले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. एकट्या पुण्यातच म्युकोरमायकॉसिस चे 300 रुग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन बाबत 10 दिवसांनी परिस्थीती पाहून निर्णय घेऊ असेही अजित पवार म्हणाले.