"वाईन विकतो दारु नाही...", देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:33 AM2022-01-29T11:33:53+5:302022-01-29T11:43:40+5:30
'आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचे नुकसान होईल असे निर्णय घेत नाही'- अजित पवार
पुणे: सध्या राज्यात किराना दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्याने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी किराना दुकानात वाईन विक्री खपवून घेतली जाणार नाही, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या विधानाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी उत्तर दिले आहे.
पवार म्हणाले, वाईन आणि दारू त्याच्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्षातून, काजूतून वाईन तयार केली जाते. यासोबतच अनेक वेगवेगळ्या फळातून वाइन तयार केली जाते. आपल्याकडे जेवढी वाईन तयार होते तेवढी वाईन खपत नाही. आजूबाजूच्या राज्यात त्याची विक्री केली जाते. काही परदेशात एक्सपोर्ट केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाइन्स पितात हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु काही जाणीवपूर्वक त्याला मद्यराष्ट्र म्हणत वेगळेच महत्त्व दिले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, शेवटी आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचे नुकसान होईल असे निर्णय घेत नाही. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वीची मागणी होती. त्यामुळे काही नियम अटी घालून वाईन विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे. पुढच्या कॅबिनेट बैठकीनंतर याची अंमलबजावणी होईल.परंतु काही लोकांनी यावरून सरकारची बदनामी सुरू केली आहे.